आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा हाहाकार:अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होतोय, जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू; नदी काठच्या नागरिकांच्या स्थलांतरावर भर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ढगफुटीचा नेमका अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहे. तर दरड कोसळूनही अनेकांचा मृत्यू झाला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'गेल्या चार पाच दिवसांपासून मी या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत असल्याचे दिसत आहे. या सगळ्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचे वचन दिले आहे मदतकार्य आणि बचावकार्य सुरु आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर दिला जातोय.' असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर कराण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ढगफुटीचा नेमका अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही
ढगफुटीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ढगफुटीचा नेमका अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही. त्यामुळे ढगफुटी नेमक्या कोणत्या भागात होईल, हे सांगता येऊ शकत नाही. कोकणात अनेक भागांमध्ये पूरामुळे रस्ते खचले असल्याचे दिसत आहे. एनडीआरएफच्या पथकांनाही त्याठिकाणी जाण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या सगळ्यातून मार्ग काढत पथके त्याठिकाणी पोहोचत असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरले आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...