आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:कोरोनाच्या पराभवाचे दहा लाख पुरावे! ‘कोरोना’चा पराभव करण्यातही महाराष्ट्र देशात आघाडीवर

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठ नागरिकांसोबत चिमुकल्यांनीही जिंकली लढाई

कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक असणारा महाराष्ट्र कोरोनाचा पराभव करण्यातही आघाडीवर असून हा अंक आपल्या हाती पडेल ताेपर्यंत राज्यातील कोरोनामुक्तांचा आकडा दहा लाखांच्या टप्प्यावर गेलेला असेल. २५ सप्टेंबरच्या सायंकाळी राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३,००,७५७ असून त्यातील तब्बल ९ लाख ९२ हजार ८०६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची सरासरी ७६.३३, तर मृत्युदर २.६७ एवढा आहे. कोरोनाग्रस्त सर्वाधिक असतानाही राज्याने धारावी पॅटर्नपाठोपाठ १० लाख रुग्णांच्या कोरोनामुक्तीचा आणखी एक टप्पा यानिमित्ताने गाठला आहे. महाराष्ट्र या जागतिक महामारीशी अत्यंत धीराने आणि खंबीरपणे तोंड देत असल्याचाच हा पुरावा म्हणता येईल. देशात लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक दोनवर असलेल्या महाराष्ट्रात रोजगारासाठी परप्रांतांतून येणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. आर्थिक राजधानी मुंबई, आयटी हब पुणे तसेच ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील औद्योगिक वसाहतींच्या परिणामी महाराष्ट्र नागरीकरणातही आघाडीवर आहे. जगभरातील कोरोना रुग्णांचा पॅटर्न बघितल्यास औद्योगिकीकरण व नागरीकरण अधिक असलेल्या ठिकाणीच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसते. त्याच धर्तीवर देशात महाराष्ट्राचा आकडा सर्वाधिक असला तरी आता कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्याही झपाट्यानेवाढत आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणायला हवी. राज्यात पुण्यामध्ये पहिला रुग्ण गेल्या ९ मार्च रोजी आढळला होता तर २५ मार्च रोजी पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतर कोरोना रुग्णमुक्तीचा एक लाखाचा टप्पा २ जुलै रोजी पार पडला व आता हा आकडा दहा लाखाच्या टप्प्यावर आला आहे. या दरम्यान, अगदी नवजात बालकांपासून ते शंभरी पार केलेल्या वयोवृद्धांपर्यंतच्या ‘फायटर्स’ने कोरोनावर विजय प्राप्त केल्याची नोंद आहे. त्यात जालन्याच्या १०७ वर्षीय, कल्याणच्या १०६ वर्षीय तसेच कोल्हापूरच्या १०३ वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अगदी नवजात बालकांनीदेखील कोराेनाला हरविल्याच्या अनेक नोंदी ठिकठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आता काेराेेनाला हरविण्यातही अग्रेसर आहे.

१९ लाखांहून अधिक क्वाॅरंटाइन
आतापर्यंत राज्यात १९,२९,५७२ व्यक्ती हाेम क्वाॅरंटाइन आहेत. त्यामध्ये रुग्ण तसेच त्यांच्या परिवारातील व्यक्तींचाही समावेश आहे. तर ३३,४१२ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइन आहेत.

कोरोनामुक्तीचा दर 78.31 टक्के
औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी ३५१ बाधितांना डिस्चार्ज मिळाला तर तितकेच नवे रुग्ण आढळले. आजपर्यंत २५,४०५ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ३२,४४० झाली आहे. सध्या एकूण ६,१३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

६२ लाखांहून अधिक चाचण्या
राज्यात आजवर ६२,८०,७८८ काेविड चाचण्या झाल्या आहेत. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण जुलैत ५० टक्के, आॅगस्टमध्ये ६० टक्के तर सप्टेंबरमध्ये तब्बल ७५ टक्क्यांवर पाेहोचले आहे.

काेराेनाला हरवून नव्या जाेमाने श्रीगणेशा
"शरीरात घुसलेल्या विषाणूला बरे करण्यासाठी तुमचे डॉक्टर आहेत, पण तुमच्या मनात घुसलेल्या विषाणूवर तुम्हालाच उपचार करावा लागेल’, कोरोनातून बरे झाल्यावर सायकलवर अष्टविनायक यात्रा करणारे हडपसरचे डॉ. राहुल झांजुर्णे यांचे हे मोलाचे बोल. अस्थिरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. झांजुर्णेंनी कोरोनातून बरे झाल्यावर सायकलवर सपत्नीक अष्टविनायक यात्रा केली. कोरोनानंतर अशक्तपणा येणे, नैराश्य येणे या टप्प्यातून तेदेखील गेले. पण सायकलिंगच्या माध्यमातून त्यांनी याच्यावरही मात केली.

देश । एकूण रुग्ण ५८ लाख ९५,२०२
कोराेनामुक्त ४८,३४,६७७
रिकव्हरी रेट ८२.०१%
एकूण मृत्यू ९३,३०३
महाराष्ट्र । एकूण रुग्ण १३ लाख ७५७
कोराेनामुक्त ९,९२,८०६
रिकव्हरी रेट ७६.३३%
एकूण मृत्यू ३४,७६१

बातम्या आणखी आहेत...