आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कोरोनाचा विळखा वाढत असून रविवारपर्यंत राज्यात 12 हजार 974 कोरोना संक्रमित झाले आहेत. तर, 2115 रुग्ण ठीक झाले आहेत. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजमितीस एकूण 462 व्यक्ती क्वारंटाईन असून त्यापैकी 320 व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 142 व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईन मध्येआहेत. तर एक पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यासोबतच आज पुण्यात 99 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारने राज्यातील सर्व नागरिकांना विना शुल्क आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यतील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही सुविधा दिली जाणार आहे.
पुढे म्हणाले की, 'सध्या राज्यातील 85 टक्के MJPJAY अंतर्गत कव्ह आहेत. आता उर्वरित 15 टक्के नागरिकांनाही या योजनेचा लाभ दिला जाईल. सरकारी, अर्द्धसरकारी कर्मचारी आणि पांढरे राशन कार्डधारकांनही यात घेण्यात आले आहे.
राज्यात शुक्रवार-शनिवारी या दोन दिवसांत १७९८ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ७९० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १२ हजार २९६ वर गेली आहे. शनिवारी ३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात मुंबईतील २७ जणांसह पुणे ३, अमरावती २, वसई विरार, अमरावती व औरंगाबादमधील प्रत्येकी एका कोरोनाग्रस्ताच्या समावेश आहे. मृतांचा आकडा एकूण ५२१ वर गेला आहे. शनिवारी १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले. आजवर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या २ हजार झाली आहे. राज्यात १ लाख ६१,०९२ चाचण्यांपैकी १ लाख ४८,२४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सध्या राज्यात १ लाख ७४,९३३ नागरिक होम क्वाॅरंटाइनमध्ये असून १२, ६२३ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.
रुग्णांचा तपशील | मुंबई मनपा ८३५९, ठाणे ५७, ठाणे मनपा ४६७, नवी मुंबई २०४, कल्याण डोंबिवली १९५, उल्हासनगर ४, भिवंडी २०, मीरा भाईंदर १३९, पालघर ४४, वसई विरार १४४, रायगड २७, पनवेल ४९, नाशिक मंडळ ३८९, पुणे मंडळ १४९०, कोल्हापूर मंडळ ६०, औरंगाबाद मंडळ २६८, लातूर मंडळ २०, अकोला मंडळ १८२, नागपूर १५१, इतर राज्ये २७.
चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज शानिवारी सायंकाळी वाजता एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या कृष्णा नगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉक डाऊन पाळावे, असे आवाहन केले आहे. नागपूर विभागात नागपूर, भंडारा पाठोपाठ आता चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. विभागात वर्धा , गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही.
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह निघाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला.उद्यापासून महानगर परिसरात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
नागपुरात १५० पार
उपराजधानी नागपुरात आणखी सात रुग्णांची भर पडल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शनिवारी दीडशे पार पोहोचला. इतर शहरांच्या तुलनेत नागपुरात वाढीचे प्रमाण कमी असले तरी स्थानिक प्रशासनाकडून संशयितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. नागपुरात रोज ७ ते ८ रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासात ७ रुग्ण वाढल्यावर नागपुरातील कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा १५१ वर पोहोचला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने नागपुरातील सतरंजीपुरा, मोमीनपुरा, भालदारपुरासह काही वस्त्या संपूर्णपणे सील केल्या आहेत. यापैकी सतरंजीपुरा परिसरातील बहुतांशी रहिवाशांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवले गेले आहे. सध्या नागपुरात सुमारे अठराशेवर लोकांना विलगीकरण कक्षात पाठवले गेले आहे.
४८ रुग्ण झाले बरे
या विलगीकरणात असलेल्या रहिवाश्यांमधूनच आता नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे. नागपुरात आतापर्यंत ४८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आता अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव |जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या ४५ वर
गेल्या दाेन दिवसात आणखी ७ पाॅझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५वर पाेहचली आहे. नव्याने पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ३ पाचाेरा व भुसावळ येथील प्रत्येकी दाेन रुग्णांचा समावेश आहे.
जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी एकूण ७७ व्यक्तीचे तपासणी अहवाल शुक्रवारी व शनिवारी प्राप्त झाले आहे. त्यापैकी ७० व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर सात व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी ४ तर शनिवारी ३ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र, काही जण अजूनही विनाकारण बाहेर भटकत आहेत.
पुणे | दौंडच्या राज्य राखीव पोलिस बलाचे ८ जण बाधित
मुंबई येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असणाऱ्या भागात बंदोबस्तासाठी गेलेल्या दौंड येथील राज्य राखीव पोलिस बलाच्या (गट क्रमांक ७) आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, एकाचवेळी एसआरपीएफच्या आठ जवानांना काेराेनाची लागण झाल्याने दाैंड शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. भाजी मंडई, किराणा दुकानेही बंद करण्यात आली असून पुढील १४ दिवसांसाठी केवळ दवाखाने व मेडिकल या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
राज्य राखीव पोलिस बलाची डी कंपनी आंतरराज्य सुरक्षा बंदोबस्तासाठी मुंबई येथील कोरोनाबाधित असलेल्या रेड झोनमध्ये कार्यरत होती. तेथील बंदोबस्त पूर्ण करून संबंधित कंपनी १६ एप्रिल रोजी दौंड येथील आपल्या गट मुख्यालयात माघारी परतली. त्यांना १४ दिवसांसाठी गट मुख्यालयापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका मंगल कार्यालयात क्वारंटाइन करण्यात आले. तसेच, त्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घशातील द्रवाचे नुमने तपासण्यासाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ८ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती समादेशक श्रीकांत पाठक यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिली आहे.
नंदुरबार | मालेगावला बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिस पाॅझिटिव्ह
मालेगावहून पोलिस बंदोबस्त आटोपून आलेल्या एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नंदुरबार जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १८ वर पोहचली आहे. नंदुरबार जिल्हा हा ऑरेंज झोेनमध्ये आहे. नंदुरबारसह अक्कलकूवा,शहाद्यात रूग्ण वाढत गेले. सद्या नंदुरबार पाच, शहादा ९ पैकी एकाचा मृत्यू, तर अक्कलकूवा चार असे एकूण १८ रूग्ण झाले आहेत. आतापर्यंत ४६१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अजून ६७ जणांचे अहवाल अजून प्रतिक्षेत आहेत.
सातारा |जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ७४ वर
१ मे रोजी एकाच दिवसात कोरोनाचे २४ रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. शनिवारी सकाळपर्यंत कोरोनाचे ५ नवीन रुग्ण सापडले असून यामध्ये पुणे येथील येरवडा कारागृहातून साताऱ्यात कारागृहात पाठवलेले न्यायालयीन कोठडीतील दोन बंदिवान कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनुमानितांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान शनिवाी नव्याने ५ कोरोना बाधित सापडल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७४ वर पोहोचली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.