आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:महाराष्ट्र 10 लाखांपार! सप्टेंबरच्या 11 दिवसांत 2 लाख 7,375 रुग्ण वाढले, शुक्रवारी पुन्हा उच्चांक 24886 नवे रुग्ण

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजपर्यंत 70% रुग्ण कोरोनातून बरे, अॅक्टिव्ह रुग्ण 2 लाख 71566

यंदा ९ मार्चला महाराष्ट्रात काेरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याच्या १८७ दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येने तब्बल १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी राज्यातील रुग्णसंख्या १० लाख १५,६८१ वर पोहोचली. विशेष म्हणजे राज्यात सप्टेंबरच्या ११ दिवसांतच तब्बल २ लाख ७,३७५ रुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोनाचे थैमान इतके सुरू आहे की, जगाशी तुलना केली तर कोरोबाधितांच्या यादीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असेल.

राज्यात शुक्रवारी पुन्हा रुग्णसंख्येने नवा उच्चांक नोंदवला. दिवसभरात २४,८८६ नवे रुग्ण, तर ३९३ मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता १० लाख १५,६८१, तर बळींचा आकडा २८,७२४ वर गेला आहे. शुक्रवारी १४,३०८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आता एकूण कोरोनामुक्तांची संख्या ७ लाख १५,०२३ वर गेली असून रिकव्हरी रेटही ७०.४% इतका झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ७१,५६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मराठवाडा : १३२७ नवीन रुग्ण
औरंगाबाद | मराठवाड्यात १३२७ नवे रुग्ण, ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात एकाच दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला.जालन्यात ७० रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात १५६ रुग्ण, ७ जणांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात ९० रुग्ण, २ दगावले. नांदेड जिल्ह्यात ३९६ नवीन रुग्ण सापडले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात १९२ अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ६ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : ३८७ रुग्ण, १२ मृत्यू
जिल्ह्यात शुक्रवारी ४२३ रुग्ण नवे, १० जणांचा मृत्यू झाला. आता एकूण रुग्णसंख्या २७,७१२, तर बळींची संख्या ७९२ झाली आहे. दिवसभरात ५०६ जणांना डिस्चार्ज मिळाला. यात मनपा हद्दीतील ४१४, तर ग्रामीणमधील ९२ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत २१,२१० रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात हॉटेल्स, रिसॉर्ट््स, होमस्टेबाबत कार्यप्रणाली जारी
मुंबई | मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्यात शासनाने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्ट््स इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास संमती दिली आहे. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट््स, होम स्टे, बेड अँड ब्रेकफास्ट, फार्म स्टे आदी सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयाने कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे.

अशी आहे शासनाची एसओपी
- हॉटेल्स व रिसॉर्ट््सने सर्व प्रवाशांची थर्मल गन आदींद्वारे तपासणी करावी.
- लक्षणे नसलेले पर्यटक व प्रवाशांनाच प्रवेश द्यावा. फिजिकल डिस्टन्सिंग सक्तीचे.
- काँटॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रशासानला प्रवाशाची माहिती देण्याबाबत त्याची ना हरकत घ्यावी
- पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्रीची माहिती असणारा अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्यतो ऑनलाइन भरून घेण्यात यावा.
- अभ्यागतांनी शक्य असल्यास त्यांच्या सामानाची स्वत:च ने-आण करावी.
- रूम सर्व्हिस संपर्करहित, ऑर्डर रूमच्या बाहेर ठेवावी. मुलांसाठीचे प्ले एरिया बंद.

बातम्या आणखी आहेत...