महाराष्ट्र : कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला १२२ वर, 14,502 जण होम क्वाॅरंटाइन, गडचिरोलीत पळसाच्या पानाचे बनवले मास्क

  • मी मिसेस सीएमचे ऐकतोय, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका : ठाकरे

विशेष प्रतिनिधी

Mar 26,2020 09:47:01 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात कोरोना व्हायरसचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ७, सांगलीमधील इस्लामपूरचे ५ तर कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १२२ वर गेली आहे. एकूण रुग्णांपैकी १४ जण बरे होण्याच्या मार्गावर असून त्यांना लवकरच घरी सोडले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


काही दिवसांपूर्वी सांगलीतील इस्लामपूर येथील ४ कोरोना रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात २ पुरुष, २ स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. त्यामुळे सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे.


नवी मुंबईतील ५७ वर्षीय पुरुष हा यापूर्वी कोरोनाबाधित आणि मृत्युमुखी पडलेल्या फिलिपाइन नागरिकाच्या संपर्कातील व्यक्ती आहे. कामोठे–पनवेल इथे आढळलेला ३८ वर्षांचा पुरुष हा त्रिनिदाद येथे गेला होता. मुंबईतील अनुक्रमे २७ व ३९ वर्षांचे दोन पुरुष रुग्ण हे अमेरिका आणि यूएई या देशांत प्रवास करून आले आहेत. कल्याण डोंबिवली परिसरातील २६ वर्षांच्या तरुणाने तुर्कस्तानचा प्रवास केलेला आहे.


गडचिरोलीत पळसाच्या पानाचे बनवले मास्क

सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी सामान्य नागरिकही मास्क घालून फिरत आहेत. पण इथे त्याचाही तुटवडा आहे. मग दुर्गम भागातील आदिवासींकडे लक्ष देण्याची सुतराम शक्यता नाही. पण आपल्यापेक्षा आदिवासी कल्पक निघाले. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींनी पळसाच्या पानाचे मास्क तयार करून ते घातले. निसर्गाशी जवळीक त्यांनी इथेही सोडली नाही.

राज्यातील कोरोनाग्रस्त : मुंबई, ४८, पिंपरी-चिंचवड १२, पुणे १८, सांगली ९, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली प्रत्येकी ६, नागपूर, यवतमाळ प्रत्येकी ४, नगर, ठाणे प्रत्येकी ३, सातारा, पनवेल प्रत्येकी २, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण प्रत्येकी १. एकूण १२२ रुग्ण, ३ मृत्यू.


९३२ जण रुग्णालयांत : बुधवारपर्यंत राज्यात विलगीकरण कक्षात २,९८८ जणांना भरती केले होते. २५३१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. सध्या राज्यात १४,५०२ लोक होम क्वॉरंटाइन, तर ९३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यभरात २२,११८ खोल्यांची सज्जता; ५५, ७०७ खाटांची सोय

- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२,११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली आहे. येथे ५५,७०७ खाटांची सोय होऊ शकेल. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.

- विभागाने राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेकडो शासकीय इमारतींमधील २२,११८ खोल्या उपलब्ध करून दिल्या. यात विश्रामगृहे, वसतिगृहांचा समावेश आहे.


मी मिसेस सीएमचे ऐकतोय, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका : ठाकरे

सर्वांनी घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, आपल्याला कुटुंबीयांसोबत वेळ घालण्याची संधी मिळत आहे. आज पूर्ण कुटुंब यानिमित्ताने एकत्र आले आहे. एक वेगळं, गमावून बसलेलं कुटुंब सुख आपण सर्वजण अनुभवत आहोत. मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय, घरी राहून तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचे ऐका, अशी मिश्किलीही त्यांनी केली.

X