आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात कोरोना:सरकारने जाहीर केली 1328 मृतांची यादी, माजी मुख्यमंत्र्यांनी केला होता आकडेवारीची लपवाछपवी केल्याचा आरोप 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील 862 तर औरंगाबादेतील 33 बळींची लपवाछपवी

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 1,13,445 झाली आहे. 24 तासांमध्ये 81 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. मुंबईमध्ये नवीन 935 केस समोर आले आहेत. तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे संक्रमितांची संख्या 60,228 झाल्या आहेत. राज्यात एकूण 6,84,268 टेस्ट करण्यात आल्या. राज्य सरकारने मंगळवारी कोरोनामुळे 1328 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या मृतांचे कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या लिस्टमध्ये नाव नव्हते. यामध्ये अनेक रुग्ण असे आहेत, ज्यांचा डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी गेल्यावर मृत्यू झाला. यामुळे आरोग्य विभागाच्या कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या लिस्टमध्ये त्यांची नावं आली नव्हती. तर यामधील 862 प्रकरणं ही मुंबईची आहेत. तर 466 रुग्ण हे राज्यातील इतर भागांमधील आहेत. आता राज्यांमध्ये कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ही 5537 झाली आहे. मुंबईमध्ये आता एकूण 3167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात कोरोनामुळे एकाच दिवसात १ हजार ४०९ बळी गेले आहेत. मात्र राज्य सरकारने मंगळवारच्या ८१ मृतांसोबतच १३२८ जुन्या बळींची नोंद केली. त्यामुळे नोंद न झालेले १३२८ मृत्यू अचानक कसे उघड झाले हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोना मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. सरकारने मंगळवारी जुन्या बळींची नोंद घेत असल्याचे सांगितल्याने फडणवीस यांच्या आरोपांनाही बळकटी मिळाली आहे.

राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने साडेपाच हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २,७०१ नव्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख १३ हजार ४४५ वर गेला आहे. मंगळवारी ८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.परंतु यापूर्वीच्या १३२८ मृतांची मंगळवारी नोंद करण्यात आल्याने बळींची संख्या आता ५ हजार ५३७ वर गेली आहे. मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सरकारने आकडेवारी जाहीर करताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सत्य पुढे आलेच’, असे टि्वट करून आकडेवारी लपवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर याचे खापर फोडले. दरम्यान, मृतांची आकडेवारी देण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे, असे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. त्यांच्या मते अशी फेरतपासणी सुरू असते, त्यात काही गैर नाही.

मुंबईतील 862 तर औरंगाबादेतील 33 बळींची लपवाछपवी

मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात मंगळवारी घेण्यात आली. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलडाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड ११, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदुर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशीम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६. याशिवाय दिवसभरात ८१ नवीन मृत्यू झाल्यामुळे राज्याचा मृत्युदर आता ४.८ झाला आहे.

सचिव, अधिकाऱ्यांच्या कारभारावर मंत्री नाराज

- राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवरून महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीत यावरून खडाजंगी झाली होती.

- मंत्र्यांना अंधारात ठेवून महत्त्वाचे प्रस्ताव परस्पर कॅबिनेटसमोर येतात असा काँग्रेस अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आक्षेप आहे. कॅबिनेट बैठकीत यावरूनच मंत्री-सचिव यांच्यात वाद झाला होता.

मराठवाड्यात १६६ नवे रुग्ण, उस्मानाबादेत गर्भवतीचा मृत्यू

औरंगाबाद | मराठवाड्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी दिवसभरात १६६ नव्या रुग्णांची भर पडली. तर उस्मानाबाद येथे ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर तर पोटातील जुळेही दगावले. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १०७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यासोबतच नांदेड २४, जालना १८, लातूर ११, उस्मानाबाद ४ आणि हिंगोली-परभणीतील प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. उस्मानाबाद शहरातील २६ वर्षीय गर्भवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मंगळवारी तिचा मृत्यू झाला.

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी फितूर

विरोधी पक्षनेत्यांना कागद कोण पुरवते हे आम्हाला नीट माहिती आहे. मंत्रालयातील काही अधिकारी-कर्मचारी सरकारविरोधात काम करीत आहेत. मात्र सरकार लोकहितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. - जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

अखेर सत्य समोर आलेच...!

मुंबईत ८६२ आणि अन्य जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले. असे एकूण १३२८ मृत्यू हे अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून आता नोंदले जातील. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले 3 महिने ही आकडेवारी लपवणाऱ्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. - देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते

आैरंगाबादेत १०७ पाॅझिटिव्ह; दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू

आैरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी १०७ जणांचे काेराेना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता २,९३२ वर पोहोचली आहे. यात दाेन पत्रकारांसह ५४ पुरुष व ३९ महिलांचा समावेश आहे. तसेच ५ काेराेनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे आता एकूण बळींची संख्या १६३ वर पाेहाेचली आहे.

बातम्या आणखी आहेत...