आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये 15 जूनपर्यंत वाढ:मुंबई, नागपूर, औरंगाबाद, जालन्यात 1 जूनपासून काही निर्बंध शिथिल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला आज संबोधित केले. गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनचे पालन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेचे आभार मानले आहेत. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.

29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील
2011 च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

12 मे 2021 चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी

  • कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.
  • यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.
  • मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
  • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
  • दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
  • कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
  • स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48 तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :

  • वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
  • सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.
  • सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती
  • व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील
  • अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील
  • दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
  • कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
  • कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

फॅमिली डॉक्टरांनी कोविड आणि नॉन कोविड रुग्णांची ओळख करावी
मुख्यमंत्री जनतेला संबोधित करताना म्हणाले की, पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. यामुळे कोरोना रुग्णांची ओळख पटणे हे अवघड झाले आहे. यावेळी आपण ज्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. कोरोना लक्षणे नसतानाही अनेक रुग्ण हे फॅमिली डॉक्टरकडे जात असतात. अशा वेळी त्यांना बेड्स मिळत नाही, मग रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज नसल्याची विनंती केली जाते. यामुळे घरीच उपचार केल्याने रुग्ण जास्त सिरिअस होतात. यामुळे फॅमिली डॉक्टरांची जबाबदारी वाढत असते. यामुळे फॅमिली डॉक्टरने कोविड आणि नॉन कोविड रुग्ण ओळखावेत.

बंधने लादण्यापेक्षा कटू काम कोणतेही असू शकत नाही
आपला महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी काम केले जात आहे. यासाठी काही निर्बंध लादले जाऊ शकतात. यापेक्षा वाईट काम कोणतेही नाही. जी जनता आपल्याला आपले मानत असते त्यांच्यावर बंधने लादणे यापेक्षा कटू काम कोणतेही नाही. कोरोना लाट कमी होत आहे यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असेही काही लोक विचारत आहे. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. मात्र आजची जी मृतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीनेच आहे.

राज्यातील जनतेचे मनापासून आभार
मुख्यमंत्री म्हणाले की, आज एका महिन्यानंतर मी तुमच्यासोबत संवाद साधत आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. गेल्या दीड वर्षांपासून तुम्ही काही बंधनांचे पालन करत आहात. या बंधनांचा परिणाम आता दिसतो आहे. यामुळे सर्वात अगोदर राज्यातील जनतेचे मनापासून धन्यवाद असे म्हणत त्यांनी आभार मानले.

चक्रीवादळं आदळत आहेत, यामुळे तारांबळ वाढतेय
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी गेल्या दशकांतील सर्वात मोठे चक्रीवादळ आले. अशी चक्रीवादळे ही गेल्या काही दिवसांपासून धडकत आहेत. एकतर कोरोना संकट आणि नंतर चकीवादळं यामुळे तारांबळ उडत आहे. दरम्यान चक्रीवादळाची माहिती मी क्षणाक्षणाला घेत होतो. मी रत्नागिरी सिंधुदुर्गला जाऊन आलो. मी धावता दौरा केला. या वादळाच्या वाऱ्याचा वेग काय अशा सर्व गोष्टींची माहिती घेत होतो. तिथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.

निर्बंध कायम राहणार

रुग्ण संख्या कमी होत असली तरीही गेल्या वेळी सर्वोच्च जी रुग्ण संख्या होती, त्या बरोबरीने आपण आलो आहोत. कडक लॉकडाऊन आपण केलेला नाही, आपण निर्बंध लावत आहोत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली असली तरीही राज्यात असे काही जिल्हे आहेत. तिथे रुग्णसंख्या ही वाढताना दिसत आहे. शहरी भागामध्ये ही संख्या कमी होत आहे मात्र ग्रामिण भागामध्ये रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे.

तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून

तिसरी लाट ही तारीख सांगून येणार नाही हे आपल्या वागणुकीवर अवलंबून राहणार आहे. गेल्या वेळीला जी लाट आली होती, त्या लाटेतला व्हायरस आणि या लाटेतला व्हायरस यामध्ये फरक पडला आहे. विषाणूने नविन अवतार घेतलेला आहे. या नवीन अवताराने अन्य काही देशांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भारतीय लोक हा व्हायरस पसरवत असल्याचेही बोलले जात आहे. हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे. रुग्णाला बरे होण्यासही उशीर लागत आहे.

54-55 लाख शिवभोजन थाळ्यांचे वितरण
मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवभोजन थाळ्यांविषयीही माहिती दिली. आजपर्यंत 74 हजार मेट्रिक टन धान्यांचे मोफत वितरण केले आहे. यासोबतच 54 - 55 लाख थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात येईल. यासोबतच संजय गांधी निराधार, दिव्यांग निवृत्ती, विधवा निवृत्ती वेतन अशा प्रकारे साडे आठशे कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. यासोबतच बांधकाम कामगारांना 154 कोटी 95 लाख रुपयांच्या निधीचे वितरण केले. हा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आला आहे. फेरिवाल्यांसाठी साधारण 52 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...