आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना परिस्थिती:वीकेंड लॉकडाऊनसाठी नियमावली जाहीर, 30 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवार राज्यात पूर्ण लॉकडाऊनची अशी असेल स्थिती

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरण न झालेल्यांना रॅपिड अँटिजन टेस्टची मुभा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या वीकेंड लाॅकडाऊनसाठी जनतेत संभ्रम राहू नये म्हणून सरकारच्या आपत्ती निवारण विभागाने शुक्रवारी सायंकाळी सविस्तर नियमावली जाहीर केली. ३० एप्रिलपर्यंत शनिवार आणि रविवार असे आठवड्यातले दोन दिवस राज्यात पूर्ण लाॅकडाऊन असणार आहे.

शनिवार आणि रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंशी निगडित असणारे माॅल, सुपर मार्केट, डिमार्ट, रिलायन्स मार्ट, बिग बझार आदी खुली राहतील. जीवनावश्यक वस्तू खरेदीशिवाय कोणत्याही नागरिकाला विश्वसनीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

लसीकरण न झालेल्यांना रॅपिड अँटिजन टेस्टची मुभा
काेरोना प्रतिबंधक लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी सरकारने १५ दिवसांत एकदा आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या. तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.

कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू राहतील
कृषी उत्पन्न बाजार समित्या चालू राहतील. स्थानिक प्रशासन त्यावर देखरेख करेल. बांधकामाचे साहित्य पुरवणारी दुकाने बंद राहतील. दळणवळणासंदर्भातील दुरुस्ती सेंटर, गॅरेज आदी आवश्यकता खुली राहतील. मात्र अॉटो पार्ट विक्री दुकाने बंद राहतील.
वाइन शॉप बंद, बारमधून पार्सल सुरू : दारूची दुकाने बंदच राहतील. मात्र नागरिकांना बारमधून पार्सलच्या स्वरूपात दारू मागवता येऊ शकेल. रस्त्याच्या कडेचे ढाबे, हाॅटेल सुरू राहतील. पण येथेही केवळ पार्सल सेवाच उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, कॉम्प्युटर विक्री दुकाने बंद राहतील.

मराठवाड्यात ७२९५ नवे रुग्ण, तर ९२ जणांचा मृत्यू
औरंगाबाद | मराठवाड्यात शुक्रवारी ७२९५ रुग्ण, तर ९२ जणांचा मृत्यू झाला. ४,८१९ जण कोरोनामुक्त झाले. उस्मानाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यात एकूण ४८,८२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रुग्ण व कंसात मृत्यू : औरंगाबाद १४१३ (३२), जालना ५२३ (८), परभणी ८४२ (१३), हिंगोली १९७ (२), नांदेड १६५० (२७), लातूर १४०४ (४), उस्मानाबाद ५३४ (१), बीड ७३२ (५).

या ९ राज्यांमध्ये आधीपासूनच बंद
गुजरात, महाराष्ट्र पंजाब, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा.

दिलासादायक : महाराष्ट्रात 45,391 जण कोरोनामुक्त
मुंबई | महाराष्ट्रात शुक्रवारी ५८,९९३ नवीन काेरोना रुग्ण, तर ३०१ मृत्यू झाले. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४५,३९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण रुग्णसंख्या ३२ लाख ८८,५४० वर पाेहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ५ लाख ३४,६०३ वर गेली आहे.

विदर्भात ११४ मृत्यू, तर ११,९७० नवीन रुग्ण
अमरावती | विदर्भात शुक्रवारी काेराेनामुळे ११४ मृत्यू, तर ११,९७० नवे रुग्ण आढळले. पूर्व विदर्भातील ९० मृतांत नागपूरच्या ६४, भंडारा १३, चंद्रपूरच्या ९ जणांचा समावेश आहे. पश्चिम विदर्भात २४ जणांचा मृत्यू झाला. यात यवतमाळ ११, बुलडाण्यात ४ जणांचा मृत्यू झाला. नागपूर विभागात ९९४०, अमरावती विभागात २०३० रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ५ लाख ५७,१३०, तर मृतांची संख्या ९७१२ झाली.

देशात शुक्रवारी १,४६,४६७ नवे रुग्ण
देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत चालली असून शुक्रवारी विक्रमी १,४६,४६७ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाकाळातील ही सर्वात मोठी संख्या आहे. शुक्रवारी देशात ६७९ मृत्यू झाले. शुक्रवारीच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १०,३२,००४ झाली. ही संख्याही विक्रमी ठरली आहे. यापूर्वी १७ सप्टेंबर रोजी १०,१७,७०५ सक्रिय रुग्ण होते. ज्यांच्यावर घरी किंवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशांना सक्रिय रुग्ण मानले जाते. रुग्णवाढीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असून या राज्यात शुक्रवारी ५८,९९३ नवे रुग्ण आढळले. छत्तीसगडमध्ये ११,४४७ नवे रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीत शाळा-कॉलेज बंद, छत्तीसगडमध्ये परीक्षा रद्द; आतापर्यंत १३ राज्यांतील शैक्षणिक संस्था बंद

४ राज्यांनी शुक्रवारी घोषणा केली

  • दिल्ली : सर्व शाळा-कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील. ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत.
  • बिहार : शैक्षणिक संस्था १८ एप्रिलपर्यंत बंद. शहरांतील बाजारपेठा संध्याकाळी ७ वाजता बंद.
  • उत्तर प्रदेश: लखनऊत १५ एप्रिल, गाझियाबादेत १७ एप्रिलपर्यत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • छत्तीसगड: दहावीच्या परीक्षा स्थगित केल्या. परीक्षांच्या नव्या तारखांची नंतर घोषणा होईल.
बातम्या आणखी आहेत...