आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:संक्रमितांचा एकूण आकडा 4 लाखांच्या पुढे; बुधवारी 9,211 नवीन रुग्णांची नोंद तर 7,478 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीएमसीने आता मुंबईतील दादर येथे मास स्क्रिनिंग सुरू केली आहे

राज्यातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 4 लाखांच्या पुढे. बुधवारी राज्यात 9 हजार 211 रुग्णांची नोंद झाली. यासोबतच राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 4,00,651 झाला आहे. तसेच, बुधवारी 298 रुग्णांचा मृत्यू झाला.यासोबतच एकूण मृतांचा आकडा 14,463 झाला आहे. चांगली बाब म्हणजे, बुधवारी 7,478 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 1,46,129 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 2,39,755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अडीच महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात

कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच एका अडीच महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. आई आणि बाळाला पन्हाळा येथील एकलव्य कोरोना काळजी सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सेंटरमधून कोरोनावर मात करून बाहेर पडणारा आडिच महिन्याच्या चिमुकल्याला आणि त्याच्या आईला टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

राज्यभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. याच काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना काळात आपल्या निवासस्थानावरुन राज्यातील कारभार पाहत आहे. यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीकास्त्र साधले जात आहे. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा ठरला आहे. उद्या ते उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येत आहे.

पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला आता स्वतः मुख्यमंत्र्यांकडूनच उत्तर मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 9 वाजता मुंबईतून पुणे शहराकडे निघतील. यावेळी पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांसंदर्भात बैठक ते घेणार आहेत.

मुंबई पोलिसांना कोविड-19 प्रादुर्भाव संपेपर्यंत सेवा निवासस्थान ठेवण्याची मुभा – अनिल देशमुख

मुंबई पोलिस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कोविड-१९ प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत त्यांची सेवा निवासस्थाने त्यांच्याकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

या निर्णयाचा लाभ बदली, सेवानिवृत्ती, वैद्यकीय अपात्रता झालेल्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच सेवेत असताना अकाली मृत्यू अशा प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना होईल. ज्या प्रकरणांमध्ये, तीन महिन्याची भाडेमाफ सवलत लॉकडाऊन अंमलात आल्यानंतर म्हणजे २३ मार्चनंतर संपली किंवा संपणार असेल, त्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने विनंती केलेली तारीख किंवा कोरोना संसर्गातील निर्बंध असेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सेवा निवासस्थाने ताब्यात ठेवण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.

40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? आशिष शेलारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मुंबईसह उपनगरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस मुंबईकरांची चिंता वाढली होती. दरम्यान बुधवारी मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली. मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणात हर्ड इम्युनिटी वाढत असल्याचे दिसून आले. यानंतर भाजपने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आशिष शेलारांनी ट्विट करत यावर प्रतिप्रश्न केले आहेत.

नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्या 3 वाँर्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत 57% तर इमारतीमध्ये 16% जणांना कोरोना होऊन गेल्याचे उघड. तर खाजगी लँबच्या सर्वेत सुमारे 25% लोकांना कोरोना होऊन गेलाय? म्हणजे 40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले? असा सवाल आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला केला याहे.