आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलगीतुरा थांबेना:सरकार पाडून दाखवाच, तुम्हाला थेट जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाची लढाई दूर करण्याचा प्रयत्न म्हणून सरकार पाडण्याचा कांगावा

सरकार पाडणार... सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचे चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच; असे आव्हानच शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. तुमचे ऑपरेशन लोटस असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला.

मध्य प्रदेशापाठोपाठ राजस्थान मध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला राज्यातलं सरकार पाडण्याचे थेट आव्हानच दिले. काही लोक मुहूर्त काढून बसले आहेत. काही कुडमुडे जोशी आहेत त्यांच्याकडे. मध्येच असे काही तरी सरकार पडणार असल्याचे बोलत असतात. हा महाराष्ट्र आहे. हे काही गोवा आणि मध्य प्रदेश नाही. तुमचं हे ऑपरेशन कमळ, लोटस इथे चालणार नाही. तुम्हाला जनतेसमोर लोटांगण घालायला लावू. असे सांगतानाच रोज रोज सरकार पडणार, सरकार पडणार काय सांगता? सरकार पाडायचे ना? मग पाडाच. हे माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. तुमच्या राजकीय जीवनाचं ते जर उद्दिष्टच असेल तर त्याला कोण काय करणार? असे राऊत म्हणाले.

जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा विरोधाचा सूरही असावा लागतो. विरोधक असेल तर सत्ता चालवण्यात मजा असते. पण, सत्ता आणि पैशाचा माज असता कामा नये. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भ्रमातून बाहेर पडा. प्रत्येकाच्या पायाखाली सतरंजी असते आणि कुणाला तरी ही सतरंजी खेचता येत असते, हे लक्षात ठेवा, असा इशारा देतानाच लोकशाही अस्थिर करू पाहणाऱ्यांना आता आणीबाणीवर बोलण्याचा आणि प्रवचन झोडण्याचा अधिकार राहिला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

चाचण्या कमी : फडणवीस; कोरोनाची लढाई दूर करण्याचा प्रयत्न म्हणून सरकार पाडण्याचा कांगावा

कोणीही सरकार पाडत नाहीये. कोरोनाची लढाई दूर करण्याचा प्रयत्न म्हणून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कांगावा केला जात असून पवारांची मुलाखत ही मॅच फिक्सिंग असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत प्रकाशित होत अाहे. या मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकार पाडण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. यावर फडणवीसांनी हे उत्तर दिले. राज्यात संख्या लपवण्यासाठी कोरोनाच्या कमी चाचण्या केल्या जात आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. देशातील ४६ टक्के मृतांचा आकडा महाराष्ट्रात आहे. अनेक मृत्यूंची नोंद केली गेली नाही. ६०० मृत्यू अजूनही अपलोड केले गेले नाहीत. लपवालपवी होऊनही येणारे आकडे मोठे आहेत. राज्यातली परिस्थिती चिंताजनक आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

‘नया हैं वह’आदित्यला टोला

कोरोनाच्या संकटात विरोधी पक्ष ‘डिझास्टर टुरिझम’मध्ये व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर फडणवीस यांनी ‘नया हैं वह’, असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला. मुख्यमंत्री ज्यांना योग्य वाटतं त्यांना मंत्री करू शकतात, पण मंत्री बनवल्यामुळे शहाणपण येत नाही, अशा शब्दांत आदित्यची खिल्ली उडवली.

बातम्या आणखी आहेत...