आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांचे टीकास्त्र:वर्षासोबत सागरचाही खर्च कमी होणार, शिंदे-फडणवीसांच्या बंगल्यातील खानपानावरील फालतू खर्चावर बंदी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले होते. यावर सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला होता. विरोधकांनी या मुद्दयावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण तापवले होते. याच पार्श्वभूमीवर आता वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या खर्चावरुन शिवसेना आणि भाजपवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने खर्चावर टाप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षासोबतच सागरचाही खर्च कमी होणार आहे.

वर्षा व सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला पाच कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे.

काय म्हणाले होते पवार?

अजित पवार म्हणाले होते, विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले. एवढे बील कसे काय? चहामध्ये सोन्याचे पाणी वगैरे घातले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

चहापाणी करायचे नाही का?

अजित पवार यांच्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले होते, कोरोना काळात वर्षा बंगला बंद असताना किती खर्च झाले, याची माहिती घेतली का? आमच्याकडे गेल्या आठ-नऊ महिन्यात राज्यभरातून सोन्यासारखी माणसे येत आहेत. त्यांच्यासाठी चहापाणी करायचे नाही का? आपली ही संस्कृती नाही का?, असा सवाल त्यांनी केला होता.

मेन्युत सर्व काही

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पाहुण्यांसाठी साधारण व विशेष पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे. साधारण पदार्थांच्या यादीत 44 पदार्थांचा समावेश आहे, तर विशेष पदार्थांच्या यादीत 29 पदार्थ आहेत. यात चहा, कॉफीपासून ते इडली, वडा, शाकाहारी, मासाहारी पदार्थांचा समावेश आहे.