आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जास मुभा:भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या पत्रानंतर निवडणूक आयोगाचे तातडीने आदेश

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या तारखा वाढवा, ऑफलाइन अर्ज स्वीकारा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलीय. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने तातडीने ही मागणी मान्य केलीय.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरायची मुदत उद्या संपतेय. सध्या महाराष्ट्रात साडेसात हजारांच्यावर ग्रामपंचायतींची निवडणूक सुरूय. त्यामुळे गावशिवारातले राजकीय वातावरण चांगलेच तापलेय.

पत्रात म्हटले आहे की...

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक आयोगाला पत्र दिले. या पत्रात ते म्हणतात की, राज्यात 7,751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे उमेदवार अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. तथापि, सर्व्हरच्या समस्येमुळे फार मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अर्ज भरण्याची मुदत उद्या 2 डिसेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत हजारो इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष होण्यास बाधा येण्याची शक्यता आहे.

ही केली विनंती

  • आयोगाने उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास परवानगी देण्याचा आदेश आज तातडीने कार्यालयीन कामकाज सुरू होईपर्यंत द्यावा.
  • आयोगाच्या सर्व्हरमधील समस्येमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात झालेली अडचण ध्यानात घेता अर्ज भरण्याची मुदत एक दिवसाने वाढवून 3 डिसेंबर 2022 पर्यंत करावी.

'राष्ट्रवादी'चेही पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही ऑफलाइन अर्ज स्वीकारावे आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र लिहून ही मागणी केलीय.

मागणी लगेच मान्य

विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुभा दिली आहे. तसेच अर्ज सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली.

वेळही वाढवला

मदान म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

बातम्या आणखी आहेत...