आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत:औषध येईपर्यंत कोरोनासोबतच मार्गक्रमण करावे लागणार; संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता, फिजिकल डिस्टन्स, सामाजिक शिष्टाचार हा मूलमंत्र : टोपे

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: चंद्रकांत शिंदे
  • कॉपी लिंक
  • कोरोना उपचारांच्या सुविधांची कमतरता नाही : टोपे

कोरोनावर औषध येईपर्यंत नागरिकांना कोविडसोबतच मार्गक्रमण करावे लागणार आहे. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता, फिजिकल डिस्टन्स आणि सामाजिक शिष्टाचार हा मूलमंत्र साथीच्या काळापुरता न राहता तो कायमचा अंगी बाळगावा लागणार आहे, असा सावधगिरीचा सल्ला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे हे खरे आहे, परंतु हा समूह संसर्ग नाही. रुग्णांची वाढ नियंत्रणात असून राज्यात लवकरच आणखी बेड्सची उपलब्धता करून देण्याचे काम राज्य सरकार युद्ध पातळीवर करीत आहे, असेही स्पष्ट केले. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, कर्मचारी यांच्याशी सतत दौरा, संपर्क ठेवून कामासोबतच त्यांना धीर देण्याचेही काम करीत आहेत. सध्याही ते मराठवाडा दाैऱ्यावर असून आपल्या धावपळीच्या कार्यक्रमातून त्यांनी दिव्य मराठीशी संपर्क साधला. 

रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत का आहे?

राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे मात्र ही वाढ अजूनही नियंत्रणातच आहे, असे मला वाटते.   रुग्ण दुपटीचा वेग कमी झाला आहे. सुरुवातीला डबलिंग रेट दोन दिवसांचा होता तो आता १० दिवसांवर येऊन थांबला आहे. राज्य शासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ४ टक्क्यांपर्यंत असलेला  मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टेस्टिंग वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे.

समूह संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) झाला हे खरे का?  

- राज्यात समूहसंसर्ग झालेला नाही, हे सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत तेथे क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. विशेषतः मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कंटेनमेंट झोनमध्ये अधिक कडकपणे शासन आदेशांची अंमलबजावणी केली आहे. 

तुम्ही म्हणता टेस्टिंग वाढवल्या म्हणून रुग्णांची संख्या वाढली, पण रुग्णांना अगोदरच लागण झालेली आहे आणि ती टेस्टिंगमुळे समोर येते असे वाटत नाही का?
जर संक्रमण झाले नसते तर निगेटिव्ह असते, तर टेस्टिंगमध्ये रुग्णांची संख्या कमी दिसायला हवी. सुरुवातीला केवळ पुणे, मुंबई, नागपूर या तीन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती ती टप्प्याटप्प्याने वाढवली आणि आता प्रयोगशाळांची संख्या ६१ झाली आहे. सध्या दिवसाला किमान ९ ते १० हजार चाचण्या केल्या जात आहेत. सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक पावले उचलल्याने राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा गुणाकार रोखण्यास यश मिळाले आहे. एक बाब नमूद करावीशी वाटते ती म्हणजे पॉझिटिव्ह आलेल्या ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना लक्षणे नाहीत, तर १० ते १५ टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरी निगेटिव्ह रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. 

रेड झोन कमी होण्याऐवजी वाढू लागले आहेत, याला आळा कसा घालणार आहात?

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे झोन जाहीर केले जातात. राज्यात रेड झोनमधील १६ जिल्हे असून ऑरेंज झोन मध्ये १४, तर ग्रीन झोनमध्ये ६ जिल्हे आहेत. ग्रीन झोनमधील जिल्हे ऑरेंज झोनमध्ये जाणार नाहीत आणि ऑरेंज झोनमधील रेड झोनमध्ये जाणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे.

रुग्णालयात कोरोना रुग्ण ठेवण्यास जागा नाही त्यासाठी काही उपाययोजना आहे का?

राज्यातील जवळपास ३४ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी मुंबई महानगर परिसर, पुणे महानगर परिसर, मालेगाव, औरंगाबाद या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईसारख्या ठिकाणी बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर राज्य शासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी, गोरेगाव येथे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून त्याद्वारे सुमारे २००० नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत. 

तुम्ही अधिवेशन काळात सांगितले होते की, प्रत्येक जिल्ह्यात ७०० बेड्सची व्यवस्था केली आहे. परंतु, तसे दिसत नाही ते का?

जेव्हा ही घोषणा केली त्यानंतर आपण लगेचच प्रत्येक जिल्ह्यात बेड्सची व्यवस्था करण्यास सुरुवात केली होती. आपली माहिती चुकीची असून जिल्ह्यांमध्ये बेड्सची संख्या जास्त आहे. राज्यभरात १,९८७ अशी रुग्णालये असून कोविड हॉस्पिटल २६१, कोविड हेल्थ सेंटर ५५० आणि कोविड केअर सेंटर ११७६ आहेत. या सर्वांमध्ये १ लाख ९७ हजार १९७ आयसोलेशन बेड्स आहेत. त्याव्यतिरिक्त अतिदक्षता विभागाच्या ७८२९ खाटा आहेत. राज्यात ९४ हजार ७७६ पीपीई किट्स असून ३ लाख एन ९५ मास्क आहेत. त्यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी असलेल्या सोयीसुविधांची महाराष्ट्रात कमतरता नाही.

राज्यातील नागरिकांना आता कोविड सोबत घेऊनच मार्गक्रमण करावे लागणार त्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?

हे अगदी खरे आहे. कोरोनावर औषध येईपर्यंत नागरिकांना कोविडसोबतच मार्गक्रमण करावी लागणार आहे. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता, फिजिकल डिस्टन्स आणि सोशल एटीकेटस् हा मूलमंत्र साथीच्या काळापुरता न राहता तो कायमचा अंगी बाळगावा लागणार आहे. मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, शिंकताना, खोकताना खबरदारी घेणे आवश्यक राहणार आहे. कोरोनावर सध्या तरी औषध नाही मात्र त्याचा विविध मार्गांनी प्रतिबंध हीच प्रभावी उपाययोजना असल्याने आपण सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजे.

कोरोना उपचारांच्या सुविधांची कमतरता नाही : टोपे 

कोरोनाबाधितांवरील उपचारांच्या सुविधांची राज्यात कमतरता नाही, असे सांगून राज्यात सर्व मिळून एकूण १९८७ कोविड रुग्णालये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...