आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची मुख्यमंत्र्यावर टीका:राज्यावरील संकट हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण; पाय पांढरे आहेत का? नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

चिपळूण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकटे येत आहेत

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेमध्ये अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत, यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले तर अनेकांचा संसार हा पूर्णपणे वाहून गेला आहे. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच खोचक टीका केली.

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकटे येत आहेत. राज्यावरील येणारी ही संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. कोरोना ही मुख्यमंत्र्यांचीच देण आहे, असा हल्लाबोल केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, 'पाठांतर करून यायचे आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती सध्या येथे आहे. गेल्या चार दिवसांपासून लोक हे अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवे होते. त्यांची जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारकडून केले गेले पाहिजे होते. सरकारने काहीच केलेले नाही. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे' अशी टीकाही त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...