आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक - महाराष्ट्र सीमावादाचे पडसाद दोन्ही राज्यात आणि राजकारणात उमटत आहेत. बुधवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही उभय राज्यातील सीमावादाचा मुद्दा गाजणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना आक्रमक झाली असून आंदोलनही सुरु केले आहेत. याच मुद्द्यावर शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत.
संघर्ष वाढला
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नामुळे दोन्ही राज्यातील संबंधांवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांकडून चिथावणी दिली जात असून कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन कर्नाटकात होत आहे. महाराष्ट्रातील वाहनांवरही हल्ले करण्यात आले. यानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला असून पुणे आणि कोल्हापुरात याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. तसेच पुण्यातही कर्नाटकाच्या वाहनांना काळे फासले गेले आहे.
शरद पवारांकडून आवाहन
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील खासदारांना आवाहन केले की, उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्रातल्या खासदारांनी कर्नाटकाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थिती सांगावी व हा मुद्दा उचलून धरावा. त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नसतील आणि जर कायदा हातात घेतला जात असेल तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारची असेल.
ठाकरे गट आवाज उठवणार
महाराष्ट्रात सीमावादाचे पडसाद पडत असून पुणे, कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दोन्ही शहरात आंदोलन केले जात असून कर्नाटकला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. आता शिवसेनेचे खासदार या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत. उद्या हाच मुद्दा हे खासदार गाजवतील अशी शक्यता आहे.
शिंदे गटाचे खासदार भेटणार अमित शहांना
महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमाप्रश्न आज जास्त तापला तर दुसरीकडे बुधवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे याच मुद्द्यावर शिंदे गटाचे खासदार या प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.