आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळात गोंधळ:लॉकडाऊन उठवल्याची मंत्री वडेट्टीवारांची परस्पर घोषणा; मुख्यमंत्र्यांनी पाडले तोंडावर

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून श्रेय घेण्याचा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा उतावीळपणा चव्हाट्यावर आला. राज्यातील लॉकडाऊन पाच टप्प्यांत उठवला जाणार असून त्याची शुक्रवारपासूनच (दि.४) अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी केली. वडेट्टीवार यांनी घोषणा करताच प्रसारमाध्यमांमध्ये ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकल्या. मात्र तासाभरातच राज्य सरकारने मुख्य सचिवांमार्फत निवेदन प्रसिद्धीला देऊन निर्बंध हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचा खुलासा केला. त्यापाठोपाठ लॉकडाऊन १५ जूनपर्यंत कायम असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ठणकावून सांगितल्यानंतर या गोंधळावर पडदा पडला. १८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे उठणार असल्याचे नवे नियम प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर होताच राज्यभरात चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री कार्यालयासह प्रशासनातही गोंधळ उडाला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. वडेट्टीवार यांनी परस्पर घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या गोंधळादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री, बडे नेतेही ‘नॉट रिचेबल’ झाले. नागपूरला निघालेल्या वडेट्टीवार यांना निरोप पोहोचवण्यात आले. त्यानंतर नागपुरात विमानतळावर उतरताच वडेट्टीवार यांनी घूमजाव केले. निर्बंध शिथिल करण्याच्या ५ टप्प्यांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री ठाकरे जाहीर करतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

औरंगाबाद-जालनासह पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक
औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, ठाणे

काय सुरू ? रेस्टॉरंट, माॅल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खासगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल.

दुसऱ्या टप्पा ६ जिल्हे : अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार, मुंबई, मुंबई उपनगर
निकष :
पॉझिटिव्हिटी रेट ५%, ऑक्सिजन बेड्स २५ ते ४०% व्यापलेले.
काय सुरू? : ५० टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू. मॉल्स, थिएटर्स ५० टक्के,लोकल ट्रेन सुरु नाही. सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण. ई सेवा पूर्ण जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के सुरू. बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने जिल्ह्याच्या बाहेर खासगी कार, बसेस, लॉंग ट्रेन, खाजगी गाड्या, टॅक्सी यांना परवानगी आहे. बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाईन , ई-कॉमर्स सुरु करण्यात आलं आहे. जीम सलून ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस आसाम १०० क्षमतेने टक्के सुरू असतील. जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथं रेड झोन आहे तिथे जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल.

तिसऱ्या टप्पा : १० जिल्हे : बीड,उस्मानाबाद, अकोला, कोल्हापूर,सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग,पालघर, रत्नागिरी
निकष : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले
काय सुरू ? अत्याआवश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. माॅर्निंग वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा. खासगी आणि शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू. आऊटडोअर खेळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ५ ते ९ सुरू सुरु असतील. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

चौथ्या टप्पा २ जिल्हे : पुणे, रायगड
निकष :
पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के व येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील.
काय सुरू ? अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु असतील. सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला २० लोक उपस्थित राहू शकतील. बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करतील. शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार आहेत. ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असेल. संचार बंदी लागू असणार आहे. सलून, जिम ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभे राहता येणार नाही.

पाचवा टप्पा : उर्वरित जिल्हे | निकष : पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.
काय सुरू ? प्रत्येक टप्प्यातील जिल्ह्यांचा दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल त्यानंतर स्थानिक प्रशासन निर्णय घेईल.

मुख्यमंत्र्यांची तीव्र नापसंती
विजय वडेट्टीवार यांच्या परस्पर घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. निर्बंध उठवण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री रविवारी जनसंवाद साधून करणार होते. त्यानंतर निर्णयाची दोन दिवसांनी अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते.

वडेट्टीवारांचे नागपुरात घूमजाव
राज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याच्या ५ टप्प्यांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे वडेट्टीवार यांनी नागपूर विमानतळावर स्पष्ट केले.

आततायीपणा नडला : मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती खरी आहे, पण त्यांनी या निर्णयाची शुक्रवारपासून अंमलबाजावणी होणार, ही चुकीची माहिती दिली. लॉकडाऊन लादताना व उठवताना नागरिकांना ४८ तास पूर्वी कल्पना द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री लॉकडाऊन शिथिल करण्यापूर्वी घोषणा करणार होते. वडेट्टीवारांच्या आततयीपणामुळे हा गोंधळात गोंधळ झाला.

जिल्हानिहाय आढावा घेऊनच अंमलबजावणीचा निर्णय : प्रशासनाचा खुलासा
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाणार आहे.

संभाव्य अनलॉकचे नियम पाच टप्प्यांत असतील
1.
पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत. (यात १८ जिल्हे येतील)
2. पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के व ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत. (यात ५ जिल्हे येतील)
3. पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के व ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील. (यात १० जिल्हे येतील)
4. पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के व येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील. (यात २ जिल्हे)
5. पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.

बातम्या आणखी आहेत...