आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा सातत्याने वाढत असल्याले दिसत आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशाराच दिला आहे. यावरुनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना ब्रिटिश काळातील रँडच्या राजवटीसोबत केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले की, '1897 साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँडने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत'
वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यानंतर लॉकडाऊनचा विरोधकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. मनसेसह भाजपनेही लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहालाय मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला होता.
मुख्यमंत्री म्हणाले होते की...
'कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करतही आहोत. परंतु रुग्ण वाढ पाहता आरोग्य सुविधा कमी पडतील की काय, अशी स्थिती आहे. आपण लॉकडाऊन टाळू शकतो. त्यासाठी जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने सर्वांनी एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढूया. दोन दिवसांत दृश्य परिणाम दिसले नाहीत तर तज्ज्ञ व संबंधितांशी चर्चा करून पर्यायांची माहिती घेऊन कडक निर्बंध जाहीर केले जातील' असा इशाराही त्यांनी दिला.
शनिवारी 49,447 नवीन रुग्ण आढळले
दरम्यान महाराष्ट्रात शनिवारी 49,447 नवीन रुग्ण आढळले. 37,821 रुग्ण बरे झाले आहेत आणि 277 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 29.53 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 24.95 लाख लोक बरे झाले आहेत. तर 55,656 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या जवळपास 4.01 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.