आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:काँग्रेसचे महागाईविरोधात 14 ते 29 नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलन, ‘जेलभरो’ही करणार- नाना पटोले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनियाजी व राहुलजी यांचे हात बळकट करण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करा - नाना पटोले

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली. पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार असून यावेळी ‘जेलभरो’ आंदोलनही केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. देशात व राज्यात भाजपने चालवलेल्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड संताप व चिड आहे. भाजप जाती धर्मांत फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजत आहे. काँग्रेस सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चौथ्या क्रमांकावरून पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला आहे. या कामगिरीत सातत्य ठेवून पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देणे व सोनियाजी व राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले.

एनसीबीच्या कारवायांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर 3000 हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले. त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलीपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदु मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचेही पटोले म्हणाले.

आजच्या बैठकीला व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्य प्रभारी सोनल पटेल, आशिष दुआ, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, आ. शिरीष चौधरी, चारुलता टोकस, संजय राठोड, भा. ई. नगराळे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस आ. धीरज देशमुख, आ. राजेश राठोड, आ. अभिजीत वंजारी, देवानंद पवार, प्रमोद मोरे, डॉ. राजू वाघमारे यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...