आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात अनेक भागात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भसह अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबईत देखील पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने आणखी चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार राज्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, सध्या राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
औरंगाबादमध्ये पावसाची हजेरी
औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीपासून चांगला पाऊस बरसत आहे. जुलैच्या अखेर पावसाने जिल्ह्यात काही प्रमाणात उघडीप दिली होती. मात्र, आता जिल्ह्यात पाऊस सक्रीय झाला असून, पावसाच्या सरी कोसळ्यास सुरुवात झाली आहे. वैजापूर तालुक्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली असून, ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार पाहायला मिळाला. वैजापूरच्या लाडगाव-कापूसवाडगाव शिवारात झालेल्या पावसाने नदी-नाले तुडंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. सोबतच शेती पाण्याखाली गेल्याने पिकांना फटका बसला आहे. यासोबत गंगापूर तालुक्यात देखील गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजा हजेरी लावत असून, या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती त्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील अगर कानडगाव, जामगाव, ममदापूर, बगडी, नेवरगाव या भागात काल पावसाने हजेरी लावली होती.
विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
विदर्भात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यायत आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.