आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पावसाळी अधिवेशन:दिवसाच्या शेवटी शोकप्रस्ताव घेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची कोंडी, अधिवेशनात 9 अध्यादेश, नवी 5 विधेयके सादर केली जातील

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शारिरिक अंतराच्या नियमामुळे अध्यक्षांच्या आसनासमोरील वेलमध्ये उतरून विरोधकांना घोषणा देता येणार नाहीत

अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांसाठी हक्काने गोंधळ घालण्याचा असतो. पहिल्या दिवसाचे कामकाज वाया जाते. मात्र, उद्यापासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी शोकप्रस्ताव कामकाजाच्या शेवटी घेत विरोधकांची गोची केली. परिणामी, विरोधकांना संपूर्ण दिवसभराचे कामकाज सत्ताधाऱ्यांना करू देण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे अवघ्या दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. बहुतांशी कामकाज पटलावर ठेवले जाणार असल्याने सरकारला घेरण्याची विरोधकांना संधी मिळणे कठीण आहे.सभाध्यक्ष तालिकेवर सदस्य नामनिर्देशित करणे, अध्यादेश पटलावर ठेवणे, पुरवणी मागण्या सादर करणे, पुरवणी मागण्यांवर चर्चा करणे, शासकीय विधेयके सादर करणे असे कामकाज विधानसभेच्या अंतिम कार्यावलीत दाखवले आहे. त्यानंतर म्हणजे दिवसाच्या शेवटी शोकप्रस्ताव होणार आहेत. शोकप्रस्तावात विरोधक गोंधळ घालू शकत नाहीत. सभात्याग करू शकत नाहीत. सभागृह तहकूब करता येत नाही. म्हणजे सोमवारच्या पहिल्या दिवशी विरोधकांना गोंधळ घालण्यास विशेष वाव ठेवलेला नाही. त्यासाठी शोकप्रस्ताव मुद्दाम शेवटी घेतल्याचे समजते. मंगळवारी म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांना बोलण्याची काहीशी संधी मिळेल, परंतु तोवर सत्ताधाऱ्यांनी आपले आवश्यक कामकाज पटलावर केलेले असेल. त्यातील बरेचसे मंजूरसुद्धा करून घेतलेले असेल. दरम्यान अधिवेशनात ९ अध्यादेश, नवी ५ विधेयके सादर केली जातील. भूमी संपादन करताना उचित भरपाई देण्याचे विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचे विधेयक, आणि महाराष्ट्र राज्य सहकारी सुधारणा विधेयक या विधेयकांचा त्यात समावेश आहे. तसेच, वर्ष २०२०-२१ चे पुरवणी मागण्यांचे विनियोजन विधेयक असेल.

विरोधकांना घोषणा देता येणार नाही

शारिरिक अंतराच्या नियमामुळे अध्यक्षांच्या आसनासमोरील वेलमध्ये उतरून विरोधी सदस्यांना घोषणा देता येणार नाहीत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करता येणार नाही. कागदपत्रे पटलावर ठेवण्याची कामे अधिक आहेत. त्यावेळी गोंधळ असला तरी अडचण नसते. लधवेधी, तारांकित प्रश्न होणार नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची विरोधकांची संधी हुकणार आहे.

विरोधक शांत : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. चहापानही ठेवले नाही. सत्ताधाऱ्यांच्या आघाडीवर सामसूम आहे. तसेच, चित्र विरोधकांच्या आघाडीवर आहे. विरोधकांनी पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली नाही की सरकावर टीकासुद्धा केली नाही.