आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 99% पाऊस; जून-जुलैमध्ये पावसात मोठे खंड, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान्सून 10 जूनपर्यंत राज्य व्यापणार : डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा जून-जुलैमध्ये पावसात मोठे खंड तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. यंदा १० जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे. कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक व ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख राहिलेले डॉ. साबळे हे गेल्या १८ वर्षांपासून दरवर्षी राज्यातील मान्सूनचा अंदाज वर्तवतात. याविषयी डॉ. साबळे यांनी सांगितले की, राज्याच्या प्रत्येक विभागातील जिल्ह्यांतील हवामानविषयक घटकांच्या निरीक्षण, नोंदीवरून हा अंदाज वर्तवला जातो. सध्या वेगवेगळ्या विभागांतील १५ जिल्ह्यांच्या गेल्या ३० वर्षांतील हवामानविषयक नोंदींवर हे मॉडेल आधारित आहे. दरवर्षी जानेवारी ते एप्रिल या काळातील कमाल-किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांचे निरीक्षण व नोंदीवरून त्या त्या भागात कसा पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला जातो. त्यानुसार यंदा राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून गुजरातच्या दिशेने येणे शक्यता असल्याचे डाॅ. साबळे यांनी सांगितले.

पावसात खंड, ६५ मिमी पावसानंतर पेरणी करा
डॉ. साबळे यांनी सांगितले, विविध हवामान घटक निरीक्षण कालावधीत अकोला, पाडेगाव, निफाड येथे वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने या ठिकाणी जून-जुलैमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. तर दापोली, पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. राज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील. काही ठिकाणी कमी दिवसांत जास्त पाऊस तर काही काळ पावसात खंड असे हवामान राहील. पेरणी करताना त्या भागात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पुरेसा ओलावा लक्षात घेऊन पेरणी करावी. शक्यतो आंतरपीक पद्धतीला प्राधान्य द्यावे.

देशात पडणार सरासरीच्या १०१ टक्के पाऊस
यंदा देशात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला. आयएमडीने यंदाचा मान्सूनबाबतचा आपला दुसरा दीर्घावधी अंदाज मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीच्या १०१ % पाऊस होण्याची शक्यता आहे. १९६१ ते २०१० या काळातील नोंदींनुसार जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरी ८८० मिमी पाऊस होतो. आयएमडीने एप्रिलमधील पहिल्या दीर्घावधी अंदाजात देशात ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मंगळवारी दुसऱ्या अंदाजानुसार, वायव्य भारतात ९२ ते १०८ टक्के, दक्षिण भारतात ९३ ते १०७ टक्के तर मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतात यंदा जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...