आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रावर जेव्हा संकट येते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठतो आणि आपले ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही, याची साक्ष देणारा हा महामोर्चा आहे. महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उद्याच्या अधिवेशनात कडक कायदा करावा. बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या मागील मास्टरमाइंड कोण आहे, हे शोधणे गरजेचे आहे. राज्यपाल काही बोलले की, त्यांच्यापुढे त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करतात, अशा लोकांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी. राज्यात जे सरकार सत्तेत आले, त्याने राज्याच्या मातीला फुटीचा आणि गद्दारीचा डाग लावला आहे, असा जोरदार घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाच्या इतर नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्याच्या इतर महापुरुषांवर करण्यात आलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्र द्रोही विधान, राज्य सरकारने घेतलेली नेभळट भूमिका, राज्यातील उऱ्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचे कटकारस्थान याचा निषेध म्हणून तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे शनिवारी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला होता.
भाजपचा राज्याचे तुकडे करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाच्या प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावे शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापि होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
मोर्चा क्षणचित्रे : तेजस ठाकरेही राजकीय कार्यक्रमात हजर
भाजप राऊत, अंधारेंच्या निषेधाचा ठराव मांडणार
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपतर्फे शनिवारी मुंबईत माफी मांगो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन परस्परविरोधी मोर्चामुळे मुंबईत आज वातावरण ढवळून निघाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देव देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत व उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजप नेते मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन करत आहेत. कांदिवलीत येथे झालेल्या आंदोलनादरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ‘अंधारे व राऊत यांना माफी मागावीच लागेल. त्यांनी संत महात्म्यांचा अपमान केला आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांना अजूनही पक्षात कसे ठेवले, याचे उत्तर द्यावे. महाविकास आघाडीच्या मोर्चाचे खरे रुप जनतेसमोर आणण्याकरता आम्ही हे माफी मांगो आंदोलन करत आहोत. येत्या हिवाळी अधिवेशनात खासदार राऊत व अंधारे यांचा निषेधाचा ठराव मांडणार आहोत.’ तसेच यावेळी ठाणे, पश्चिम मुंबई इतर ठिकाणी ही बंद पुकारण्यात आला होता.
शिंदे गटाच्या मोर्चाला अल्प प्रतिसाद
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा निषेध नोंदवण्यासाठी शिंदे गट, भाजप व हिंदुत्ववादी संघटनांकडून शनिवारी डोंबिवली व कल्याण ग्रामीणमध्ये बंदची हाक दिली होती. व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, हिंदुत्ववादी संघटना, वारकरी संप्रदाय यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. काही दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र, एकूण या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.
मोर्चाचे ड्रोन शॉट दिसले नाही : फडणवीस
मोर्चावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंचा पक्ष जसा नॅनो होतोय, तसाच मोर्चा नॅनो होता. महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये अशी आमची भूमिका आहे. मात्र केवळ राजकीय भांडवल करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. तीन पक्ष एकत्र येऊनही ड्रोन शॉट दाखविता आले नाहीत. त्यांना क्लोज शॉट दाखवावे लागले. आम्ही त्यांना आझाद मैदान घेण्याची विनंती केली होती, तिथे त्यांना कोपराही भरवता आला नसता.’
मुंबईशी खेळ केल्यास आगडोंब : ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, फक्त महाराष्ट्रद्वेषी लोक या मोर्चात सहभागी नाहीत. स्वतःला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे म्हणवणारे तोतये खुर्चीसाठी लाचार आहेत. कोश्यारींना मी राज्यपालच मानत नाही. पालकमंत्री लोढा हे मुंबईचा हिशोब स्क्वेअर फूट करु पाहतात. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. तिच्याशी खेळ केला तर आगडोंब पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ठाकरेंनी दिला.
पदावर राहण्याचा अधिकार नाही : पवार
महात्मा फुले यांनी सामान्यांना संघटीत करण्यासाठी, शेतीमध्ये बदल आणण्यासाठी, स्त्री शिक्षणाला पुढाकार देण्यासाठी मोठे काम केले. त्यांचे नाव देशभर आदराने घेतले जाते. त्या व्यक्तीची राज्यपालांकडून टिंगलटवाळी केली जात असेल तर त्या पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी वेळेत केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी केंद्राला दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.