आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:शाळेची घंटा वाजली; ग्रामीण भागातील 5 ते 12 वी, तर शहरी भागातील 8 ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरले: एका बाकावर एक विद्यार्थी झिकझॅक पद्धतीने

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड १९ संसर्गामुळे गेले दीड वर्ष कुलूपबंद असलेल्या राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२, तर शहरी भागातील इयत्ता ८ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू होत असून शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षक-मुख्याध्यापकांशी संवाद साधणार आहेत. शाळा व जिल्हा प्रशासनांनी वर्ग भरवण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबत १ ऑक्टोबर रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालकांना एक परिपत्रक पाठवून तयारीबाबत आदेश दिलेले आहेत. ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक लस अद्याप घेतली नाही त्यांनासुद्धा शाळांतली उपस्थिती अनिवार्य आहे. तसेच लस घेतलेल्यांना मात्र आरटीपीसीआर चाचणीतून सूट देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील १ ते ४ आणि शहरी भागातील १ ते ७ या इयत्तांचे आॅनलाइन वर्ग मात्र पूर्वीप्रमाणे नियमित भरवले जाणार आहेत.

दैनंदिन हजेरीचा अहवाल
शाळातील विद्यार्थी पट व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचा दैनंदिन अहवाल पाठवण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.

एका बाकावर एक विद्यार्थी झिकझॅक पद्धतीने बसवणार
जालना : शालेय खेळांवर सध्या असतील बंधने
सोमवारी जिल्ह्यातील ग्रामीण १६२४, तर शहरी १९५ शाळांत विद्यार्थ्यांची किलबिल सुरू होणार आहे. त्यानुसार दाेन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत याचे नियाेजन जाणून घेतले. बैठकीत जि.प.चे सीईओ, शिक्षणाधिकारी, शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शालेय खेळ घेण्यावर बंधने घातली असून त्यामध्ये खो-खो, कबड्डीही घेण्यास मनाई करण्यात आली असून क्रिकेट तसेच इतर शारीरिक शिक्षण या प्रकारचे खेळ याला परवानगी देण्यात आली आहे.

95% शिक्षकांचे उस्मानाबादेत लसीकरण
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ११०० शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. शाळेत येणाऱ्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करायची की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नव्हता. ९५ टक्के शिक्षकांचे लसीकरण झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शाळा सॅनिटायइझ करण्याचे काम सुरू झाले होते. एका बाकावर एकच विद्यार्थी असेल.

परभणी : 1848 शाळांमध्ये वाजणार घंटा
- शहरी भागात ५२१, तर ग्रामीण भागात १३२७ शाळा सुरू होतील.
- पाचवी ते बारावीच्या ग्रामीणमधील १ लाख ३७ हजार विद्यार्थी व आठवी ते बारावीच्या शहरी भागातील १ लाख २८ हजार ३० विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल.
- एका बाकावर एक विद्यार्थी झिकझॅक पद्धतीने बसवला जाईल.
- बहुतांश शिक्षकांचे लसीकरण झाल्याचे उपशिक्षणाधिकारी (मा.) विठ्ठल भुसारे यांनी सांगितले.

बीड : विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी
जिल्ह्यात शहरी २५५, तर ग्रामीणमधील १८४६ अशा एकूण २१०१ शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यात ११ हजार शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे स्कॅनिंग केली जाणार आहे.

लातूर : शिक्षकांना आरटीपीसीआर अनिवार्य
आरटीपीसीआर चाचणी झालेल्या शिक्षकांनाच वर्गावर पाठवण्यात येणार आहे. जिल्ह्यात बहुतांश शिक्षकांची चाचणी झाली आहे. जिल्ह्यात ८७८ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. सध्या १०७ शाळा सुरू आहेत. पाचवी ते बारावीचे ३ लाख १३ हजार १८८ विद्यार्थी जिल्ह्यात आहेत.

हिंगाेली : एक लाख विद्यार्थी येणार शाळेत
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७५०, तर ५७ खासगी शाळा सुरू होणार आहेत. या शाळांमधून सुमारे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिल्या दिवशी ७५ हजार ते एक लाख विद्यार्थी शाळेत येतील असा अंदाज आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचण्या यापूर्वी झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील साडेतीन हजार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले. शाळेत येताना विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर अनिवार्य असेल.

87% शिक्षकांनी नांदेडमध्ये घेतले दाेन्ही डाेस
जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ३ हजार ७३१ शाळा आहेत. त्यापैकी जि.प.मार्फत चालवल्या जाणाऱ्या २ हजार १९८ शाळा आहेत. या शाळांमध्ये २४ हजार ४६८ शिक्षक, तर पाचवी ते बारावीचे साडेसहा लाखांच्या जवळपास विद्यार्थी आहेत. जि.प.चे ९ हजार २२३ शिक्षक, तर २ लाख ६ हजार १६९ विद्यार्थी आहेत. जि.प. शाळेतील ८७ टक्के शिक्षकांनी दोन्ही डोस घेतले.

बातम्या आणखी आहेत...