आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील राजकीय भूकंपादरम्यान बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गुवाहाटीला पोहोचले. शिंदे गटाची बैठकही आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरतमध्ये या बंडखोर आमदारांचे बंद झालेले फोन गुवाहाटीत उरतल्यावर त्यांना पुन्हा देण्यात आले. यानंतर यातील काही आमदारांनी विविध माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिंदेंसोबत 45 आमदार असल्याचे ते स्वत: सांगतात. परंतु त्यांच्यासोबतचे आमदार हा आकडा कमी-अधिक फरकाने सांगत आहेत.
आमदारांचा आकडा 46च्या पुढे - आमदार संजय शिरसाट
औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीही एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आम्ही सर्वजण गुवाहाटीत बरोबर आहोत. आमची बैठक झाल्यावर योग्य शिंदेसाहेब सांगतील तो निर्णय घेऊ. आमच्यासोबत शिवसेनेचे सध्या 35 आमदार आणि 5 अपक्ष आमदार असून दुपारपर्यंत हा आकडा 46च्या पुढे जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नेतृत्वावर नाराजी का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमची नाराजी नेतृत्वावर नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी असल्याचेही ते म्हणाले. पुढे भाजपसोबत जाणार का यावर ते म्हणाले की, याचा निर्णय शिंदे साहेब घेतील. इतके दिवस गप्प का होता, आताच नाराजी का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, मधला काळ महामारीचा होता, कोविडचा होता. यादरम्यान असे करणे योग्य नव्हते, म्हणून त्यांनी (शिंदेंनी) आता निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.
आमदार स्वखुशीने सोबत
काही आमदारांना भीती दाखवून, इच्छा नसतानाही तेथे बसवल्याचाही आरोप संजय राऊतांनी केला. या प्रश्नावर ते म्हणाले की, आमदाराला असा धाक दाखवता येत नाही, सर्व जण एकदिलाने येथे आहोत. नितीन देशमुखांची प्रकृती एकदम चांगली आहे. बाहेर ज्या अफवा आहेत त्यावर लक्ष देण्याचे कारणच नाही.
भुमरे म्हणतात- 35 ते 36 आमदार सोबत
शिवसेनेचे आणखी एक आमदार संदिपान भुमरे यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भुमरे म्हणाले की, 35 ते 36 आमदार सेाबत आहेत. आम्ही एकत्र आहोत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सोबत आहोत. पक्षाध्यक्षांचे आणि शिंदेंचे काय बोलणे झाले माहिती नाही, मात्र आता एकनाथ शिंदे काय आदेश आणि सूचना देणार त्याचे पालन करणार आहोत.
शिवसेनेतच राहणार, पण वेगळा गट
भुमरे पुढे म्हणाले की, मला अनेक फोन आले, खैरे साहेबांनीही कॉल केले होते. जिल्ह्यातील 5 आमदार आम्ही सोबत आहोत . आमचं म्हणणं आहे की, मतदारसंघातील कामे व्हायला हवीत. आमदारांची नाराजी काँग्रेस राष्ट्र्रवादीवर आहे. पक्ष प्रमुखांवर नाहीच. आधीपासून त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे. सगळेच मंत्री आहेत, 10 मंत्री सोबत. आजही आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत. पक्ष बदलणार नाही, मात्र शिंदेंसोबत काम करणार. शिवसेनेतच राहणार, मात्र आमचा वेगळा गट असेल, असेही भुमरेंनी स्पष्ट केले.
आता शिंदे साहेबांचा आदेश पाळणार - भुमरे
उद्धव ठाकरेंवर नाराजी का? या प्रश्नावर भुमरे म्हणाले की, माझी वैयक्तिक नाराजी नाही, काम होण्याचा हेतू होता. शिंदे सगळी कामे करतात, त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहेच. सत्ता अली तर काम व्हायला पाहिजेच. आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंना सांगायचो- आपली काम होताना अडचणी येतात. मविआ सरकार आल्यावर आम्हाला खूप त्रास झाला. 40 आमदार सोबत येण्याला काही कारण असेल ना? काँग्रेस -राष्ट्रवादीपासून प्रचंड त्रास झाला. आता शिंदेसाहेब सांगणार तेच करणार, त्यांच्या आदेशाचं पालन होणार असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.