आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (१६ जुलै) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली होती. मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल जाहीर केला जाणार आहे.
इयत्ता नववीमधील अंतिम गुण, इयत्ता दहावीचे अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे मूल्यमापन यांच्या आधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. मंडळाने दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित केली होती. मात्र, सरकारने १२ मे २०२१ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्यातील १६ लाख ५४ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण आणि वेबिनारचे आयोजन १० जून रोजी करण्यात आले होते. त्यानंतर २३ जून ते २ जुलै या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी आपल्या संगणक प्रणालीमध्ये हे गुण नोंदवले. यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस पात्र ठरले. आठ माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
संकेतस्थळावर दुपारी १ वाजता निकाल होईल उपलब्ध
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http: /result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: /result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. सन २०२१ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्रेणी सुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.