आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांना साकडे:परीक्षा घेण्यासारखी स्थिती महाराष्ट्रात नाही; देशभर एकच सूत्र ठेवा : मुख्यमंत्री

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन नाहीच; अनलॉक-२ ची तयारी करा : पंतप्रधान मोदी
  • मातोश्री येथून व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही, त्यामुळे केंद्र सरकारने व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत, असे स्पष्ट केले. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस मान्यता मिळावी, शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून त्वरित कर्जपुरवठा करावा, अशा मागण्याही केल्या.

लगेचच परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुणनिश्चिती करण्याचा फॉर्म्युला तयार करण्याचे ठरवले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा रीतीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधीदेखील असेल, असे सांगून त्यामुळे केंद्राने व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समान निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या मागण्या

१ राज्याकडे पीपीई किट्स, एन-९५ मास्कची उपलब्धता आहे. मात्र, ग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटर्सची गरज.

२ कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी विविध औषधांचा समावेश असलेल्या काही उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मान्यता मिळावी.

३ व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल.

४ गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढील ३ महिने कालावधी वाढवून मिळावा, त्यामुळे रेशन कार्डधारकांना लाभ मिळेल.

कुलपतींना संदेश

विद्यापीठ स्तरावरील सर्व शाखांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कुलपती या नात्याने राज्य सरकार परस्पर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगून कोश्यारी यांनी परीक्षा घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळेच बुधवारी ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांसमोर हा मुद्दा उपस्थित करून परीक्षांचे एकसमान सूत्र ठेवण्याची मागणी केली.

अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे... : 

इतके दिवस आपण लॉकडाऊनविषयी बोललो, पण मला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे, अशी सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राने ‘मिशन बिगीन अगेन’मधून मोठी झेप घेतली आहे. राज्याने काही दिवसांत ३ लाख बेड्सची सुविधा निर्माण केली. धारावीसारख्या भागातही संक्रमण रोखण्यात यश मिळवले असून महामारीच्या काळात राज्याने १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केल्याचे ठाकरे यांनी मोदींना सांगितले.

लॉकडाऊन नाहीच; अनलॉक-२ ची तयारी करा : मोदी

नवी दिल्ली | देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी फेटाळली आहे. कोरोनाविरुद्धच्या युद्धात अनलॉक-१चा आढावा घेताना मोदी यांनी १४ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ऑनलाइन बैठकीत त्यांनी लॉकडाऊनच्या अफवांशी लढताना अनलॉक-२ कडे लक्ष द्या, असे निर्देश दिले. मास्क, स्वच्छता आणि फिजिकल डिस्टन्सिंगकडे काटेकोर लक्ष द्यावे, अशी सूचनाही केली. कोरोनाला आपण जेवढे थोपवू, तेवढा त्याचा संसर्ग कमी होईल. अर्थव्यवस्थेलाही उभारी येईल, असे पंतप्रधान म्हणाले. बैठकीला ममता बॅनर्जी अनुपस्थित होत्या.

आरोग्य सुविधांचा विस्तार करा :

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवाव्या लागतील. कोरोना चाचण्यांवर भर द्यावा लागेल. टेलिमेडिसिनचा विस्तार करावा.

बातम्या आणखी आहेत...