आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिलासा:महाराष्ट्र अनलॉक -1 : प्रतिबंधित क्षेत्र वगळता रेड झाेनमध्ये तीन टप्प्यांत सूट, राज्य सरकारने केला ‘मिशन बिगीन अगेन’चा प्रारंभ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३० जूनपर्यंत राज्यात हॉटेल्स, मॉल्स, धार्मिक स्थळे सुरू होणार नाहीत

देशभरात शनिवारी लॉकडाऊन-५ ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारने रविवारी राज्याची अनलॉक-१ ची नियमावली जाहीर केली. त्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता रेड झोनमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी रविवारी अनेक अटी शिथिल केल्या. त्यानुसार तीन टप्प्यांत अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. मात्र काेरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही गोष्टींवर संपूर्ण राज्यात निर्बंध घातले आहेत. मॉल्स, मेट्रो रेल्वे, शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे व धार्मिक स्थळेसुद्धा ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहेत.  मुख्य सचिव अजोय मेहता यांनी महामारी साथ नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत लाॅकडाऊन शिथिल करण्यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. लाॅकडाऊनच्या - ५ पर्वास ‘मिशन बिगीन अगेन’ असे नाव दिले आहे. रेड झोनमधील महापालिकांमध्येही म्हणजे मुंबई पालिकेसह एमएमआर क्षेत्रातील पालिका तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात तीन टप्प्यांत लॉकडाऊनमध्ये सूट असणार आहे. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल्स, हॉटेल्स, रेस्तराँ, स्पा आणि सलून तसेच मंदिरे ३० जूनपर्यंत बंदच ठेवण्यात येतील.

टप्पा एक : ३ जून | प्लंबर, गॅरेज सुरू होणार

> प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी. { गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना. 

> सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीस परवानगी. 

> उद्याने, मैदानावर जॉगिंग, सायकलिंग, धावणे आदी व्यायामास परवानगी.

> सामूहिकपणे व्यायामास मनाई असणार आहे. खुल्या मैदानात गर्दीस मनाई.

टप्पा दोन : ५ जून | दुकाने सम-विषम पद्धतीने

> रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम आणि विषम पद्धतीने दिवसाआड सकाळी ९ ते ५ वेळेत उघडणार.

> दुकानांत गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरावेत. 

> खरेदी जवळच्या दुकानात करावी. स्वयंचलित वाहनांच्या वापरास मनाई. 

> फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम मोडल्यास दुकान बंद केले जाईल. अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा, कार, कॅबमध्ये १ अधिक २ व्यक्ती तर दुचाकीवर चालकास परवानगी. 

> खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये चालत वा सायकलने जावे. 

> अत्यावश्यक वस्तूशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई.

> खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

टप्पा तीन : ८ जून :

> सर्व खासगी कार्यालये १०% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालवण्यास परवानगी. उर्वरित कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय घ्यावा.

> अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी - १ चालक १ प्रवासी, रिक्षा - १ चालक २ प्रवासी, खासगी चारचाकी - १ चालक २ प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवासाची परवानगी. 

नॉन रेड झोन : दुकाने ९ ते ५ वाजेपर्यंत खुली

> सरकारच्या कोणत्याही विभागाची सूट दिलेल्या कामांसाठी परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. 

> खासगी कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह सुरू करता येतील. 

> एसटी बसमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना  जिल्ह्यांंतर्गत प्रवास करता येईल. आंतरजिल्हा प्रवास नाही. 

> खुल्या मैदानात एकट्याने व्यायामाला परवानगी, मात्र बंदिस्त स्टेडियमच्या वापरास बंदी आहे. 

> राज्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी दिली आहे.

यावर बंदी कायम : शाळा, काॅलेजेस, कोचिंग क्लासेस, सलून, ब्यूटी पार्लर 

राज्यभर शाळा, काॅलेजेस, कोचिंग क्लासेस, विनापरवानगी आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मेट्रो, सिनेमागृहे, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, माॅल्स, हाॅटेल्स, रेस्तराँ आदींवर बंदी कायम असेल.

प्रवास नियम : आरोग्यकर्मींना मुभा 

१ डाॅक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णवाहिका यांना राज्यात किंवा आंतरराज्य प्रवासाला कुणाचीही संमती घ्यावी लागणार नाही. राज्यात अडकलेले परप्रांतीय कामगार, विद्यार्थी, यात्रेकरूंना आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासाला प्रशासनाकडून संमती घ्यावी लागणार आहे.

२ राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या सामान वाहतुकीस संमती. सार्वजनिक जागी थुंकणे, तंबाखू खाणे वर्ज्य.

३ अंत्यसंस्कारास कमाल २० आणि विवाहास कमाल ५० व्यक्ती हजर राहू शकतील.

प्रतिबंधित क्षेत्र : काेरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या कंटेनमेंट क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवांना संमती. इतर सर्व कार्यांना पूर्वीप्रमाणे येथे प्रतिबंध असणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणर नाही.

0