आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाब्दिक चकमक:तुम्हीच तुमच्या पक्षाची अवस्था ‘ना घर का ना घाट का' अशी केली! - चंद्रकांत पाटील; शिवसेनेने हेच पत्र मुखपत्रात छापून लिहिले- चंद्रकांत दादांच्या लेखणीला फेस

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्येय सध्या वाद सुरू आहे. या वादामुळे भाजप आणि शिवसेनेमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अग्रलेखाच्या माध्यमातून निशाणा साधला होता. आता चंद्रकांत पाटील यांनी खणखणीत पत्र लिहित या अग्रलेखाला उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांनी खोचक शब्दांत शिवसेनेचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे सामना या वृत्तपत्रातच चंद्रकांत पाटलांचे पत्र छापण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांचे प्रसिद्धी दिल्याबद्दल जाहीर आभार देखील मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री अडचणीत आल्यावर तुम्ही उसळलात आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून हल्ला केलात. पण अशी तत्परता तुम्ही शिवसेनेचे नेते अडचणीत आल्यावर दाखवत नाही. तुम्ही तुमच्या पक्षाची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी केली. असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. हे पत्र सामनामध्ये छापत असताना शिवसेनेने चंद्रकांतदादांच्या लेखणीला फेस आणि अहंकाराचे बुडबुडे असे शिर्षक देत त्यांना प्रत्युत्तर दिलेय. तसेच नियमित सामना वाचत असल्यामुळे त्यांच्यात लेखी प्रतिक्रिया देण्याची खुमखुमी उत्पन्न झाली म्हणत त्यांना टोलाही लगावण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांनी पत्रामध्ये काय लिहिले ?

 • 'तुम्ही मला सातत्याने भरपूर प्रसिद्धी मिळवून देता. राजकारणात प्रसिद्धी महत्त्वाची असते. ‘एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’, असे राजकारणासाठी म्हणतात. तुम्ही माझ्यावर नियमित टीका करता आणि त्याची चर्चा मीडिया करते, मग मला आपसूक प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धीच्या बाबतीत आम्ही संघवाले तसे कच्चे आहोत. आम्हाला संघात शिकवले जाते की, ‘अच्छा कर और कुएं मे डाल.’ म्हणजे चांगले काम करा आणि विसरून जा. संघात प्रसिद्धी आणि स्वतःचे ब्रँडिंग असे विषय वर्ज्य असतात. त्यामुळे संघ ही जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असूनही कोठेही प्रसिद्धीचा बडेजाव नसतो. माझ्यासारख्या संघ स्वयंसेवकाला हे प्रसिद्धीचे प्रकरण मोठे अवघड जाते. पण संजय राऊत, तुम्ही माझ्यावर टीका करता आणि आपसूक प्रसिद्धी मिळते. आता मी संघाचे नाही तर एका राजकीय पक्षाचे काम करतो. राजकारणात संघासारखे प्रसिद्धीपराङ्मुख असून चालत नाही. म्हणजे प्रसिद्धीकडे पाठ फिरवून चालत नाही. हो, जरा वेगळा शब्द वापरला की तुम्हाला अर्थ सांगावा लागतो. राजकारणात प्रसिद्धी तर हवीच. ती तुम्ही मला मिळवून देता म्हणून तुमचे आभार.'
 • 'शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, धन्यवाद. ‘सामना’ने दि. २१ सप्टेंबर रोजी लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल हे आभार आहेत. वृत्तपत्राचा अग्रलेख हा संपादकाच्या नावे ओळखला जातो आणि ‘सामना’च्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे आहेत. तथापि, आपण कार्यकारी संपादक आहात आणि आपणच अग्रलेख लिहिता असा सार्वत्रिक समज असल्याने तुमचे आभार मानले,'
 • 'तुम्ही माझ्यावर या अग्रलेखात बरीच चिखलफेक केली आहे. पण तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या बरोबरी नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. नुकतेच मी एका नेत्याबद्दल पाठीत खंजीर खुपसला, असा वाक्प्रचार वापरला तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला संपादक असून माहिती नाही. त्यामुळे प्रोटोकॉल शब्द का वापरला हे सांगितले. विशेष म्हणजे तुमच्या पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही आज हाच वाक्प्रचार वापरला. मी हा वाक्प्रचार वापरल्यानंतर तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते,'
 • 'मी तुम्हाला उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही, असे म्हणण्याचे कारण की, मी महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्या अध्यक्षतेखाली भाजपाने तुमच्या पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकली आहे. मी पाच वर्षे राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो. आयुष्यातील उमेदीच्या काळात तारुण्यातील अनेक दशके अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम केले आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर टीका केली तर मी त्याला उत्तर देणे हे बरोबरीचे झाले असते. ते राजकारणातील प्रोटोकॉलला धरून झाले असते. पण तुमचे तसे नाही. तरीही तुमचे आभार मानतो,'
 • “तसे तुमचे आभार मानण्याचे बरेच दिवस डोक्यात होते. कारण तुम्ही वारंवार मला अग्रलेखातून लक्ष्य करता. तुम्ही अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बडय़ा नेत्यांवर टीका करता आणि माझ्यावरही टीका करता त्यामुळे मला बडय़ा नेत्यांच्या रांगेत नेण्याचा सन्मानही देता. त्याच पद्धतीने आज तुम्ही ‘तोंडास फेस, कोणाच्या ?’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहून मला पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता मात्र तुमचे आभार मानलेच पाहिजेत असे वाटल्याने हे पत्र लिहिले,”
 • 'तुम्ही अग्रलेखात लिहिले आहे की, ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?‘ संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे,'
 • 'कोल्हापूरचा पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही, असाही दावा संजयराव तुम्ही अग्रलेखात केला आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. किरीट सोमय्या यांनी एक आरोप केला तर मुश्रीफ थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तेच आडवे झाले. मग हे गडी पहेलवान कसे आहेत, हे तरी सांगा'
 • 'संजय राऊत तुम्ही अग्रलेखात एक षटकार ठोकला आहे त्याचा उल्लेख तर करायलाच हवा. हसन मुश्रीफांचे कौतुक करता करता तुम्ही म्हटले आहे, ‘‘कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरूडला विजय मिळवावा लागला.’’ कमाल आहे ! आमचे काय झाले आम्ही बघून घेऊ, पण कोल्हापूर जिह्यात शिवसेनेचाही पराभव झाला त्याचा तुम्हाला आनंद झाला की काय ? कालची विधानसभा निवडणूक कोल्हापूर जिह्यात भाजपा शिवसेनेबरोबर युती करून आणि जागावाटप करूनच लढली होती, हे विसरलात की काय? या निवडणुकीत कोल्हापूर जिह्यात शिवसेना सहापैकी पाच जागांवर पराभूत झाली आणि एकच आमदार उरला, हे माहितीसाठी. सध्या तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली माहिती असते. पण शिवसेनेचा विसर पडला, असे वाटल्याने सांगितले,'
 • 'तुमचे हे असे वागणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उदो उदो करताना तुम्ही शिवसेनेलाही सुपडा साफ म्हणायला कमी करत नाही. त्यामुळेच असेल कदाचित, राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री अडचणीत आल्यावर तुम्ही उसळलात आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून हल्ला केलात. पण अशी तत्परता तुम्ही शिवसेनेचे नेते अडचणीत आल्यावर दाखवत नाही. शरद पवारांवर कोणी टीका केली की त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे तुम्ही अंगावर येता. त्यामुळेच तुम्हाला शिवसेनेत कोणी गांभीर्याने घेत नाहीत, असे दिसते. तुमच्या मध्यस्थीने आणि पुढाकाराने शिवसेनेने भाजपासोबतची विजयी युती तोडली आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता मिळवली. पण तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही. उद्धवरावांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली, पण खरे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले. शिवसेनेच्या इतर बहुतांश नेत्यांना तर खुर्चीसुद्धा मिळाली नाही. या प्रकारात शिवसेनेचा मूळ मतदार नाराज झाला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तर उभेही करत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पक्षाला ‘ना घर का ना घाट का’, असे करून ठेवले. भाजपाचे नुकसान करणाऱया शिवसेनेची राजकीय पत तुम्ही संपवलीत. तुम्ही सातत्याने शरद पवारांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भजन करत असता त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. तुम्ही पलटी मारली असेल तर तो तुमच्या पक्षप्रमुखांचा प्रश्न आहे,'
 • 'असो. तरीही तुमचे आभार. कारण तुमच्यामुळे संघ परिवार संतापला आहे, भाजपाचा मतदार दुखावला आहे आणि शिवसेनेचा मतदार अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा माझ्यावर टीका करता त्यावेळी या सर्व घटकांमध्ये माझ्याबद्दल चांगला मेसेज जातो. राजकारणात मित्र कोण आहेत या इतकेच शत्रू कोण आहेत हेसुद्धा महत्त्वाचे असते. किंबहुना ते अधिक महत्त्वाचे असते. राजकारणात ‘निगेटीव्ह पब्लिसिटी’चाही उपयोग असतो. फक्त तशी टीका योग्य ठिकाणाहून व्हावी लागते. सज्जनांनी टीका केली तर धोका असतो. तुमच्यासारख्यांच्या टीकेचा फायदाच होतो,'
बातम्या आणखी आहेत...