आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने विरोध केला जात आहे. हा विरोध भाजपच्या राजकीय भूमिकेमुळे असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. मात्र उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार? असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले की, 'देशात लॉकडाऊनची गरज आहे की, नाही याविषयी निर्णय पंतप्रधान घेतील. मात्र काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. चर्चा करत त्यांचे मुद्दे लक्षात घेतले. लॉकडाऊनची गरज असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. जर केंद्राला वाटत असेल की, लॉकडाऊनची गरज आहे. तर पंतप्रधान मन की बात देशाला सांगतील. मात्र पश्चिम बंगालच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर याविषयी केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतात.'
फक्त गुजरात तुमचा नाही तर संपूर्ण देश तुमचा
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'लोकांच्या जीवाचे संरक्षण करणाऱ्या औषधांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होणे बरोबर नाही. फक्त गुजरात तुमचा नाही तर संपूर्ण देश हा तुमचाच आहे. तुमचे गुजरातवर अधिक प्रेम आहे, हे मी समजू शकतो. मात्र आपण देशाचे पंतप्रधान आहात, ही गोष्ट नरेंद्र मोदींनी लक्षात घ्यायला हवी असे राऊतांनी म्हटले आहे. यासोबतच प्रकाश जावडेकरांनी केंद्रात बसून आम्हाला ज्ञानामृत वाटण्याची गरज नसल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे. तसेच त्यांनी मुंबई किंवा पुण्यात येऊन येथील परिस्थिती बघावी असेही ते म्हणाले आहेत'
अशा परिस्थितीत राजकारण करणे कोणालाही शोभत नाही
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर टीका करत संजय राऊत म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केला असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्यापुरती भूमिका आहे. देशातील भूमिका ही वेगळी असू शकते. जर पंतप्रधान मोदींनी देशात पुन्हा लॉकडाऊन लागू केला, तर देवेंद्र फडणवीस म्हणतील का की महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन लागू करा. अशा परिस्थितीत राजकारण करणे कोणालाही शोभत नाही. लोकांचे जीव वाचवणे हे महत्त्वाचे आहे' असे राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.