आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. या वादानंतर आता काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावेळी नाना पटोलेंची अनुपस्थिती पाहायला मिळाली. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळाचा नारा देत आहेत. यासोबतच ते सातत्याने महाविकास आघाडीच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहेत. यानंतर शरद पवारांनीही नाना पटोलेंवर भाष्य केले होते. मी पटोलेंसारख्या लहान माणसांवर प्रतिक्रिया देणार नसल्याचे पवार म्हणाले होते. यानंतर पटोले पवारांवर नाराज असल्याचे बोलेल जात आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये नाना पटोले अनुपस्थित आहेत यामुळे ही भेट आता चर्चेचा विषय बनली आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. याविषयी बोलताना पवार म्हणाले होते की, 'या गोष्टीत मी पडत नाही. नाना पटोले वगैरे ही लहान माणसे आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू? सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो'.
तर नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर शरद पवार म्हणाले होते की, 'प्रत्येक पक्षाला आपली राजकीय भूमिका मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आम्ही सरकार एकत्र चालवतो मात्र याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवतोय असा होत नाही. पक्ष वेगळेच चालवतो. यामुळे काँग्रेसने राजकीय भूमिका मांडली. शिवसेनेने मांडली, आमच्या पक्षातून जयंतरावांनी मांडली. प्रत्येकाला आपापल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्याचा अधिकार आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.