आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात रोज एकाला धमकी येत असल्यामुळे राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तीनदा धमक्या मिळाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नींना सुद्धा धमकी आली. अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत ते थेट सलमान खान. या साऱ्यांना धमक्या मिळाल्या. त्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार, असा सवाल निर्माण होत आहे.
राज्यातला अति उच्चभ्रू, राजकीय वर्गच सुरक्षित नसेल, तर सामान्यांचे काय? त्यांना पुसतो कोण? त्यांच्या जीवाकडे कोणाचे लक्ष असणार? असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होत आहे. दुसरीकडे या धमक्यांचे मूळ सूत्रधारापर्यंतही पोलिस अजून पोहचलेले नाहीत. हे थांबणार केव्हा, असा सवाल आता निर्माण होत आहे.
थेट गृहमंत्र्यांना धमकी
राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांना एकाला बेड्या ठोकल्यात. नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री बारा वाजता फडणवीसांच्या घरी धडक दिली. घराचा काना-कोपरा धुंडाळला. मात्र, घरात कसलिही बॉम्ब सदृश वस्तू आढळली नाही. त्यामुळे हा फेक कॉल असल्याचे समोर आले. धमकी देणारी व्यक्ती काही कारणामुळे दुखावली होती. त्यामुळे त्याने दिशाभूल करण्यासाठी ही नसती उठाठेव केल्याचे समोर आले आहे. त्याची अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अमृतांना केले ब्लॅकमेल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानाला बेड्या ठोकल्या. त्यात अनिक्षाला जामीन मिळाला. अनिल जयसिंघानी अजून कोठडीत आहे. त्याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानीवर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून अनिल जयसिंघानीचा शोध सुरू होता.
गडकरींना 10 कोटी मागितले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आतापर्यंत जवळपास तीनदा धमक्या आल्या आहेत. त्या 22 मार्च रोजी बेळगाव तुरुंगातून 10 कोटींची मागणी करणारा फोन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात आला. विशेष म्हणजे बेळगावच्या कारागृहातून हा फोन केला. त्यासाठी एका तरुणीच्या मोबाइलचा उपयोग करण्यात आला. या तरुणीची विचारपूस केली असता कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली नाही. त्यात पोलिसांच्या बेळगाव कारागृहात केलेल्या अचानक तपासणीत जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याच्याकडून यापूर्वीच्या आणि आताच्या गुन्ह्यात वापरलेले मोबाइल आणि सिम कार्ड मिळाले. या जयेश कांथाला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन नागपुरात आणले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे उलगडण्यास मदत होणार आहे.
संजय राऊतांना इशारा
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनाही आज धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या मोबाइलवर पाठवलेल्या मॅसेजमध्ये राऊतांची एके 47 ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना हिंदूविरोधी म्हटले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांची हत्या करू. लॉरेन्सकडून हा संदेश पाठवण्यात आला आहे, असे धमकीत म्हटले आहे. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप देशपांडेवर हल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईत हल्ला झाला होता. या प्रकरणी “भांडूप कनेक्शन’ समोर आले. दोघांना अटक करण्यात आली. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी आपल्याला पोलिस संरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले. तसेच शिवाजी पार्कवर क्रिकेट (हल्ला) खेळण्यासाठी आलेले “क्रिकेटर’ (हल्लेखोर) आणि त्यांचे कोच (मास्टरमाइंड) कोण याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे सरकारने आता त्यांच्या सुरक्षेची काळजी करायला हवी, असा इशारा दिला होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एक 56 वर्षीय आरोपी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे. हाच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे म्हटले होते.
सलमान खानही रडारवर
लॉरेन्स बिश्नोई गँगने अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसे पत्र सलमानचे वडील सलीम खान यांच्या अंगरक्षकाला मिळाले आहे. त्यात सलमानचा सिद्धू मुसेवाला करू, असे म्हटले आहे. या प्रकरणी सलमानच्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानतो. त्यामुळे लॉरेन्सने ही धमकी दिली आहे. एका वृत्तवाहिनाली दिलेल्या जाहीर मुलाखतीमध्येही सलमान खानने माफी न मागितल्यास आपण त्याला धडा शिकवू, असा इशारा दिला होता.
आव्हाडांचे कुटुंब टार्गेटवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये आव्हाड यांच्या मुलीला स्पेनमध्ये शुटर लावून शुट करून टाकायचे. त्यांचा जावई जर भेटला नाही तर त्यांच्या घराजवळ काहीतरी गोंधळ घालायचा म्हणजे ते आई-वडिलांना भेटायला येतील. हे सर्व बाबाजींच्या जीवावर करीत असतो असे बरेच काही आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी आव्हाड समर्थकांनी महेश आहेर या अधिकाऱ्याला मारहाणही केली होती.
अशोक चव्हाणांवर पाळत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या प्रकरणी नांदेडच्या पोलिस अधीक्षकांना भेटून तक्रार दिली होती. तसेच बोगस लेटरपॅडच्या आधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या मागचा सूत्रधार शोधून कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली होती.
अविनाश जाधव निशाण्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनाही जिवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणात नौपाडा पोलिसांमध्ये मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील वन विभागाच्या जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर जाधव यांना त्यांच्या मोबाइलवर एक चित्रीकरण आले. त्यामध्ये जाधव यांच्या छायाचित्रावर फुल्ली मारण्यात आली होती. ‘हम उसे जिंदा नही छोडेंगे, कोई गुस्ताख छुपा नहीं पायेगा, हमन उसे ढूंड-ढूंड कर मारेंगे, तारिख वाह है, गुस्ताख कल भजी ना बंच पाया था, आज भजी ना बंच पायेगा, नभी सें’ अशी ऑडियो क्लीप होती.
वाटचाल नेमकी कुठे?
महाराष्ट्रात सुरू असलेले धमक्यांचे सत्र पाहता आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज्याचे गृहमंत्री, त्यांच्या पत्नी, केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, प्रमुख नेते आणि कलाकार मंडळींना सुरक्षित वाटत नसेल, तर इतरांच्या जीवाचे काय, असा सवाल निर्माण होतोच. बर राजकीय वैरातून हा प्रकार असेल, तर हे टोकाचे वागणे योग्य नाही, इतकी समजही आपल्याला येऊ नये. हे भयंकर आहे. याला सरकार आणि पोलिस लगाम कसा घालणार हे पाहावे लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.