आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षीण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात उद्यापासून म्हणजेच 4 ते 6 मार्चपर्यंत राज्यातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानात मोठा चढउतार पहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच उन्हाचा चटका वाढला होता. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच काही भागात ढगाळ वातारण निर्माण झाले आहे.
कुठे पावसाची शक्यता?
शनिवारपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर रविवार आणि सोमवारी विदर्भात पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे पावसांच्या हलक्या सरींची शक्यता आहे. तर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मुंबईमध्ये ढगाळ वातावरण
याशिवाय सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या सरी पडू शकतात. मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले, तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भात मात्र वाढू शकतो.
विदर्भातही पावसाची शक्यता
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारसाठी विदर्भात पिवळ्या रंगातील इशारा म्हणजे वातावरणाकडे लक्ष ठेवून राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उष्णतेची लाट
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. येत्या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसात शहराचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. देशाच्या उत्तरेकडील भागातून उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहताना वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमानात अचानक वाढ झाली आहे. अशातच आता राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.