आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस पुढील पाच दिवस सुरूच राहण्याचे संकेत आहेत. आज (ता. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. एप्रिलमध्येही गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अजूनही हे संकट संपलेले नाही. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिलपर्यंत हे संकट कायम राहील.
आज येथे वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
राज्यात पावसाला पोषक हवामान
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
तापमानात घट
हवामान विभागाने सांगितले आहे की, आज (ता. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अवकाळी पिच्छा सोडेना
4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्चदरम्यान राज्यात अवकाळीचे नैसर्गिक संकट ओढवले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 177 कोटींच्या मदतीचीही घोषणा केली आहे. एप्रिल सुरू झाला तरी अवकाळी संकट अजून शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाही. रविवारी रात्री नाशिक, जळगाव व नगर जिल्ह्यातील काही भागांना गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिकच्या बागलाण, सटाणा भागात कांदा, गहू, हरभरा, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले. नगरमध्ये रविवारी 3700 हेक्टर पिकांना फटका बसला. जळगाव जिल्ह्यातही काही प्रमाणात नुकसान झाले.
संबंधित वृत्त
गारपिटीने स्वप्नांची राखरांगोळी:द्राक्ष, कांद्यासह सर्वच पिकांचे मातेरे...डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर; शेतकऱ्यांची व्यथा
दोन पोरांची स्वप्नं साकार करण्यासाठी शेतात राब राब राबतोय... एकाला देशसेवा करायची म्हणून तो होस्टेलमध्ये राहून एनडीएचा अभ्यास करतोय.. त्याला वर्षाला दोन लाख रुपये लागतात... त्याला काहीही कमी पडू नये म्हणून आम्ही दोघे नवरा-बायको शेतीत घाम गाळतोय.. कांदा काढायला आल्यानं दोन दिवसांत सुरुवात करायची होती.. पण नशिबात वेगळंच लिहिलेलं होतं.. गारपिटीने घात केला व अडीच एकर कांदा खराब झाला... मजुरी जाईल म्हणून आम्ही दोघंच राबायचो... पैसे जोडून व काही उधारी करून कांदा वाढवला होता. आता पुन्हा बोकांडी कर्ज बसल्याने घेतलेले पैसे कसे चुकते करायचे... ओल्या डोळ्यांनी कांद्याकडे पहात इगतपुरीच्या शेणित येथील आशा तानाजी तुपे बोलत होत्या...वाचा संपूर्ण ग्राऊंड रिपोर्ट
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.