आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. कमाल तापमानातही वाढ झाली आहे. अशातच राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.
आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज राज्यातील 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणजेच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
पावसाला पोषक हवामान
सध्या तामिळनाडूपासून कर्नाटक ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. अशातच राजस्थान व लगतच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात जोरदार बरसण्याची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 28 मार्चपर्यंत विदर्भात जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 26 मार्चला अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम यवतमाळ, भंडारा येथे विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीतही मुसळधार पावसाची शक्यतात वर्तवण्यात आली आहे. 27 व 28 मार्चलाही विदर्भात जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कमाल तापमानात वाढ
दरम्यान, राज्याच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच आहे. त्यामुळे उकाड्यातही वाढत होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर, अकोला, ब्रह्मपूरी, वर्धा, यवतमाळ येथे कमाल तापमान 35 अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी 12 अंशांच्या पुढे कायम आहे.
अवकाळीमुळे राज्यात 1.39 हेक्टरचे नुकसान
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. एकट्या महाराष्ट्रात 1.39 लाख हेक्टरवरील पिके आडवी झाली. आतादेखील हवामान विभागाने अनेक भागांत मुसळधार ते मध्यम पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अस्मानी संकटांची मालिका थांबण्याची चिन्हे नाहीत.
अधिवेशनाकडे लक्ष
राज्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे सुरुवातीला 13 हजार हेक्टर, नंतर 40 हजार हेक्टर व आता सुमारे 1 लाख 39 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आज तरी मदत जाहीर होते का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.