आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, एप्रिल ते जूनदरम्यान बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदाच्या उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज शनिवारी (ता. 1) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला आहे.

त्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह, पश्चिम विदर्भात एप्रिल ते जूनदरम्यान तापमान सरासरी इतके राहणार आहे. तर, पूर्व विदर्भ, कोकणात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

एप्रिलमध्ये उष्ण लाट शक्य

एप्रिल महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर, देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

पारा 38 अंशांपर्यंत

राज्यात बहुतांश ठिकाणी पारा सध्या 38 अंशांपर्यंत गेला आहे. आजपासून राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. आज राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या राज्यात तीव्र उष्ण लाटेची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या मध्य पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता अधिक आहे. एप्रिल महिन्यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालचा दक्षिणेकडील भाग, उत्तर छत्तीसगड, गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब हरियाना राज्यात तीव्र उष्ण लाटेची शक्यता आहे.

कमी दाबाचा पट्टा निवळला

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. आता केवळ ओडिशापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.