आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी:राज्यभरात 3 दिवस वादळी पाऊस, हवामान विभागाचा इशारा; कांदा, आंब्यासह अनेक पिकांचे नुकसान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात 8 ते 10 एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल. तर, मराठवाड्यात आज (ता. 8) मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण असून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

आज या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  • कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
  • मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव.
  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
कोकणचा काही भाग वगळता अवघ्या महाराष्ट्रावर ढग जमा झाले आहेत. हवामान विभागाने जारी केलेले छायाचित्र.
कोकणचा काही भाग वगळता अवघ्या महाराष्ट्रावर ढग जमा झाले आहेत. हवामान विभागाने जारी केलेले छायाचित्र.

एप्रिलमध्ये अवकाळीचा तडाखा

ऐन एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्राला पुन्हा तडाखा दिला आहे. शुक्रवारी रात्री (ता. 7) विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पाऊस बरसला. त्यामुळे पपई, खरबूज, आंबा, संत्रा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यात 10 एप्रिलपर्यंत हे वातावरण कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

पहाटे, रात्री गारवा

तापमान चाळिशीपार गेल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या होत्या. अशात राज्यभरात काळे ढग दाटून आल्याने तसेच पावसाच्या हजेरीमुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे पहाटे व रात्री गारवा निर्माण झाला आहे. उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

शुक्रवारपासून पावसाची हजेरी

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी दुपारपासून तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यात वादळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने कांदा, लिंबू व खरबूज आदी पिकांचे नुकसान झाले. तर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बसरला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली होती.

पावसाला पोषक हवामान

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यावरही ढगांची दाटी झाली असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.

संबंधित वृत्त

राज्याला पुन्हा अवकाळी तडाखा:वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू, मराठवाडा, खान्देश, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात पाऊस

राज्यभरात विविध ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. सिल्लोड तालुक्यात वीज पडून एकाचा तडाख्यात मृत्यू झाला. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात वीज पडून ३ जण, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. या पावसामुळे पपई, खरबूज, आंबा, संत्रा, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले. कोल्हापुरात एक जणाचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर