आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्ये गारठा वाढणार:हवामान विभागाचा अंदाज; ख्रिसमस, थर्टी फर्स्टला कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे. निफाड आणि धुळे येथे पारा पुन्हा 10 अंशांच्या खाली घसरला आहे. अशातच डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि वर्षअखेरीस कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

IMDचा दीर्घकालीन अंदाज

भारतीय हवामानविभागाने (IMD) नुकताच डिसेंबरच्या तापमानाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. राजस्थान, मध्य प्रदेश, काही उत्तरेकडील भाग, हिमालयीन प्रदेश आणि महाराष्ट्रासह दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये डिसेंबरमध्ये थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थंडीत पुन्हा वाढ

20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान राज्यातील सर्वच भागात तापमानात मोठी घट झाली होती. बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. मात्र, त्यानंतर तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस झाला. परिणामी महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले, तापमानात वाढ झाली आणि थंडी गायब झाली. मात्र, आता पुन्हा थंडीत वाढ झाली आहे.

नोव्हेंबरच्या तुलनेत कडाका वाढणार

हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये तापमानात मोठी घसरण होईल. या महिन्यात, कोकण ते विदर्भापर्यंतच्या सर्व भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तापमानातील घसरण अधिक काळ टिकण्याची शक्यता आहे. मध्य भारत, देशाच्या उत्तर-पश्चिम भागात डिसेंबरमध्ये तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

आज कोरडे हवामान

आज राज्यात कोरड्या हवामानासह, तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारपर्यंत गारठा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज धुळे येथे नीचांकी 9.4 अंश सेल्सिअस, तर निफाड येथे 9.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

विविध शहरांतील किमान तापमान

औरंगाबाद- 10.8, पुणे- 11.1, जळगाव- 11.4, धुळे- 9.4, कोल्हापूर- 19.1, महाबळेश्वर- 14.9, नाशिक- 12, सांगली- 16.5, सातारा- 16.7, सोलापूर- 17.7, नांदेड 16, उस्मानाबाद- 15.4, परभणी- 13.8, अकोला- 13.5, अमरावती- 13.5, बुलडाणा- 13.8, नागपूर- 13.3

बातम्या आणखी आहेत...