आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जळगावमधील चोपडा शहर व तालुक्यात सकाळी 7 वाजेपासून अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे काढणीला आलेली रब्बी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
बुलढाणा, नंदूरबारमध्ये सरी
याशिवाय काल बुलढाण्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. नंदूरबारमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात दमदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ठाणे जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गहु, हरबरा, मका, आंबा, पालेभाज्यांचे नुकसान
अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी पिकांतील काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच मालाचे पडलेले भाव व त्यात अवकाळी पावसामुळे पिकेही हातातुन जाण्याची भीती असल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. द्राक्ष काढणीला आल्याने त्यातच पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
8 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस
पश्चिमी चक्रवाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. त्याच्या परिणामामुळे राज्यात काही भागात गारपीठीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 ते 8 मार्चपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि सोमवारी मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भात सर्वत्र पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघरमध्ये 8 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात 7 मार्चच्या आसपास गारपीट होईल.
यंदाचा फेब्रुवारी सर्वात उष्ण
राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहे. 123 वर्षांमध्ये यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण ठरला आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीत सरासरी कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअसल नोंदवले गेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. आवश्यक असल्यास डोक्याला रुमाल बांधून किंवा टोपी घालून बाहेर पडावे. सोबत पाण्याची बाटली ठेवावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
संबंधित वृत्त
ला निनाचा काळ संपतोय, जगाच्या हवामानावर परिणाम:ऑस्ट्रेलियासह पूर्व प्रशांतमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता; पावसावर परिणाम
जागतिक हवामान विज्ञान संघटनेने जागतिक तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. यासोबत ला निनानंतर पुढे उष्णता वाढवणारा अल निनो विकसित होऊ शकतो. यामुळे पावसाच्या पॅटर्नवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पर्यावरणाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या डाऊन टू अर्थच्या अहवालात नमूद केले की, अल निनो ३ वर्षांनंतर खूप असामान्य हवामानाचा टप्पा पूर्ण करत आहे. यामुळे जगाच्या हवामानावर खूप परिणाम होऊ शकतो. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.