आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढील 2 दिवसांत पुन्हा थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पुढच्या 48 तासांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे. किमान पारा 2 ते 4 अंशांनी खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशाच्या उत्तरेत मागच्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. याच कारणामुळे पुन्हा थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 5-6 दिवसांमध्ये महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात ऊनही वाढल्याने थंडीची लाट कमी झाली होती.
सातत्याने बर्फवृष्टी
यंदाच्या मोसमात सर्वात किमान तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे. त्यामुळे पहाटेसह दिवसभर हुडहुडी जाणवत आहे. राज्यभरातील सर्वच थंड हवेच्या ठिकाणी बोचरी थंडी पडली आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यात सातत्याने बर्फवृष्टीही होत आहे.
तापमानात 2 ते 4 अंशांनी घट
जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये मोठा हिमवर्षाव झाला आहे. त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत दिसण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 दिवसात राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
तापमान सरासरीपेक्षा कमी
पुणे, मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. गुजरातमार्गे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पालघर, उत्तर मुंबई आणि ठाण्यावर अधिक परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.