आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या काळात संयुक्त सभांच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारला सळो की पळो करून सोडायचे यासाठी एप्रिल ते मे या कालावधीत ‘मविआ’च्या संयुक्त सभा घेण्याची रणनीती आखली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची संयुक्त बैठक बुधवारी (८ मार्च) विधान भवनात झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधान भवनातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडीची बैठक झाली. बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई, आमदार आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, काँग्रेसचे सुनील केदार, सतेज पाटील आणि महाविकास आघाडीतील अन्य आमदार उपस्थित होते. आगामी काळात शिंदे सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने आणखी आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभांचा कार्यक्रम आणि नियोजनासंदर्भात १५ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ मविआच्या संयुक्त सभांचा प्रारंभ २ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगर येथून केला जाणार आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे सभेला मार्गदर्शन करणार आहेत. १६ एप्रिल रोजी नागपूर, १ मे रोजी मुंबई, १४ मे रोजी पुणे, २८ मे रोजी कोल्हापूर, ३ जून रोजी नाशिक आणि नंतर अमरावती येथे संयुक्त सभा घेतली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.