आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे उवाच...:18 ते 44 वयोगटाचेलसीकरण थंडावणार, कोव्हॅक्सिनचे 3 लाख डोस 45 वर्षांवरील नागरिकांना देणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्यूकरमायकोसिस इंजेक्शनच्या 1 लाख कुप्यांची खरेदी

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरवण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

सध्या राज्यात कोव्हॅक्सिन लसींचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोव्हॅक्सिन) प्रतीक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोव्हॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाखावर डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोविशील्डचा देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचा आहे.

महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्या तरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते.

ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात प्रयत्न केले जात असून विविध जिल्ह्यांत ३०० पेक्षा जास्त पीएसए यंत्र खरेदीचे कार्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

इथेनॉल प्लँटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रयोग उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्याने केला असून या कारखान्यात तंत्रज्ञांच्या साहाय्याने दररोज ४ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात झाली आहे. त्याद्वारे दररोज ३०० ऑक्सिजन सिलिंडर्स पुरविता येतील.

राज्यातील रुग्णालयांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयएमएने ही मागणी केली होती.

म्यूकरमायकोसिस इंजेक्शनच्या १ लाख कुप्यांची खरेदी
मधुमेह नियंत्रित नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढत असून या आजारावरील प्रभावी ठरलेल्या इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हाफकिनकडे मागणी नोंदवण्यात आली असून निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रिया केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...