आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज फैसला:आरोग्याची आणीबाणी! कडक लॉकडाऊन लागणारच; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्यापारी, गरिबांसाठी मदत जाहीर करा : भाजपची मागणी

दररोज झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात किमान ८ ते १५ दिवस लाॅकडाऊन अटळ असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले. कोरोना लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ काढावीच लागेल. जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य नागरिकांच्या आरोग्याला आणि जिवाला असले पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे सूतोवाच केले. यासंदर्भात रविवारी (११ एप्रिल) कोरोना टास्क फोर्समधील तज्ज्ञांसोबत बैठक होणार असून त्यानंतर लॉकडाऊनच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाइन बैठकीत संवाद साधला. प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली. तसेच राज्यात लॉकडाऊन न केल्यास १५ एप्रिलनंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी शक्यता वर्तवली.

बैठकीत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी रेमडेसिविर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट‌्स लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना केल्या. संपूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवतानाच व्यापारी, दुकानदार, गरिबांसाठी पॅकेज जाहीर करा, असे फडणवीस म्हणाले. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या.

लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ काढावीच लागेल : मुख्यमंत्री
कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना, पण कडक निर्बंध लावावेच लागतील. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता सर्व खुले झाले तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येत आहेत. एका बाजूला जनभावना आहे; पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे.अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.

नियोजन लोकांसमोर मांडा
निर्बंध असले पाहिजेत, पण जनतेचा उद्रेकसुद्धा विचारात घ्यावा. यातून मार्ग काढण्यासाठी छोटे व्यावसायिक, रिटेलर्स, केशकर्तनालये आणि इतरही व्यावसायिकांची भावना विचारात घ्यावी लागेल. जे काही नियोजन आहे, लोकांसमोर मांडा. विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करेल, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मरण झाले स्वस्त, भावनांचा कचरा; धुळ्यात मृतदेह कचरागाडीतून नेण्याची वेळ
मरण झाले स्वस्त, भावनांचा कचरा; धुळ्यात मृतदेह कचरागाडीतून नेण्याची वेळ

सामोडे | मृत्यूनंतरही मरणयातना भोगण्याची वेळ या कोरोनाने आणली आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील सामोडे येेथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला अंत्यविधीसाठी नेण्यास रुग्णवाहिका आलीच नाही. दहा तासांच्या प्रतीक्षेनंतर मृतदेह अखेर कचऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीतून नेण्याची वेळ नातेवाइकांवर आली. यासाठी चार-पाच नातेवाइकांनी पीपीई किट परिधान करून पुढाकार घेतला.

संपूर्ण लॉकडाऊन झाला तरच दुकाने बंद ठेवू, अन्यथा उद्यापासून उघडणार : व्यापारी
नाशिक | संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय रविवारी (दि. ११) संध्याकाळपर्यंत झाल्यास व्यापारी त्यात सहभागी होतील, अन्यथा सोमवारी (दि. १२) सकाळी दुकाने उघडण्याचा व व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम असेल, असा निर्णय शनिवारी (दि. १०) व्यापारी संघटनांच्या बैठकीत झाल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. ‘लॉकडाऊन व ब्रेक द चेन, पुढे काय?’ या विषयावर राज्यातील सभासदांची ऑनलाइन बैठक झाली.

बातम्या आणखी आहेत...