आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमडेसिविरसाठी राज्यभर आक्रोश:महाराष्ट्रासाठी कोण जबाबदार? गरज 50 हजारांची, मिळाले 30 हजार;  नागपुरात गडकरी, जालन्यात टोपे जबाबदारी घेतात

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेमडेसिविरसाठी रुग्णांचे नाते‌वाईक रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले होते.

दररोज सुमारे ५० ते ५५ हजार कोरोना रुग्ण वाढत असल्याने राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला अाहे. गुरुवारी पुणे, अमरावती शहरांमध्ये रेमडेसिविरसाठी नातेवाइकांना वणवण फिरावे लागले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णांच्या नातेवाइकांनी ठिय्या अांदोलन सुरू केले. दुसरीकडे, रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या ७ जणांना गुरुवारी पुण्यात अटक करण्यात आली आहे. एकीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती असताना अारोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जालना जिल्ह्यास १० हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. नागपुरात रेमडेसिविरचा तुटवडा झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी थेट सन फार्मास्युटिकल्स कंपनीला फोन लावून १० हजार इंजेक्शनची मागणी केली होती.

कंपनीने शनिवार, १७ एप्रिलपर्यंत ५ हजार इंजेक्शन पाठवणार असल्याचे सांगितले अाहे. दरम्यान, राज्यात दररोज सरासरी ५५ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णाची भर पडत आहे. हे प्रमाण कायम राहिले तर एप्रिलअखेरीस दैनंदिन १ लाख ५० हजार रेमडेसिविरची आवश्यकता भासू शकते, असा इशारा कोरोना टास्क फोर्सने सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने राज्याचे अन्न व आैषध मंत्री डॉ. राजेश शिंगणे यांच्याशी संपर्क साधला असता राज्याला दररोज ५० हजार व्हयलची गरज असताना गेल्या तीन दिवसांपासून ३० ते ३५ हजार इंजेक्शनच उपलब्ध होत आहेत अशी कबुली दिली.

औषधमंत्री म्हणतात : रेमडेसिविरचा पुरवठा होत होता. पण रुग्ण आणि उपलब्ध रेमडेसिविर याच्यात कायम व्यस्त प्रमाण होत आहे. त्यात तीन दिवसांपासून दैनंदिन ३० ते ३५ हजार रेमडेसिविर प्राप्त होत आहेत. तुलनेत दैनंदिन ५० हजार रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे तुटवडा भासत असल्याचे मंत्री शिंगणे म्हणाले. रेमडेसिविरच्या निर्यातीवर केंद्राने नुकतीच बंदी घातली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांना निर्यात साठ्याची राज्यात विक्री करण्यास अनुमती देण्याचा आमचा मानस आहे. दोन दिवसांत याचा निर्णय होईल. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर हा प्रश्न हाताळला जाईल. त्यानंतर राज्याला दैनंदिन ७५ हजारपेक्षा अधिक रेमडेसिविर प्राप्त होतील, असे मंत्री शिंगणे यांनी स्पष्ट केले. बहुतांश रेमडेसिविर सरकारी रुग्णालयास पुरवली जात आहेत. मात्र खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सर्वत्र रेमडेसिविरचा तुटवडा असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे मंत्री शिंगणे यांनी सांगितले.

१५ कंपन्यांशी चर्चा : देशातील रेमडेसिविर उत्पादक १५ कंपन्यांशी राज्य सरकारने दोन दिवसांत चर्चा केली. रेमडेसिविरच्या या निर्यातदारांकडे मोठा साठा आहे. तो मिळवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. त्यास यश आल्यास पुढच्या पाचेक दिवसांत राज्याला रेमडेसिविरचा पुरेसा साठा प्राप्त होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रेमडेसिविर ही संजीवनी नाही, ८५% रुग्ण प्राथमिक उपचारांनी बरे करण्याचे नियम आहेत. कोरोनावरील उपाय म्हणून या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेले नाही, तरी शहर-खेडोपाडीचे डॉक्टर्स त्याचे प्रिस्क्रिप्शन्स देत आहेत, रुग्णाचे नातलग ते घेऊन धावत आहेत. हे चुकीचे आहे. त्यामुळे यात “बॅड सायन्स’ आहे, असे आम्हाला वाटते.

मंगळवारनंतर रोज ७५ हजार व्हायल मिळणार
राज्याला आज दैनंदिन ५० हजार रेमडेसिविर व्हायलची गरज आहे, मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवघी ३० ते ३५ हजार रेमडेसिविर राज्याला मिळत आहेत, अशी कबुली देऊन मंगळवार, २० तारखेनंतर राज्याला दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक रेमडेसिविर प्राप्त होतील, अशी माहिती अन्न व औषधमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’ला दिली. राज्याला गुरुवारी (ता.१५) एकही रेमडेसिविर व्हायलचा पुरवठा झाला नाही, या माहितीत काहीही तथ्य नाही.

रेमडेसिविर ही संजीवनी नाही, ८५% रुग्ण प्राथमिक उपचारांनी बरे - डॉ. रवी वानखेडकर, माजी अध्यक्ष, आयएमए रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोनावरील सिद्धहस्त औषध नसून विशिष्ट परिस्थितीतच त्याचा उपयोग हितकारी ठरत असल्याचे मत आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी “दिव्य मराठी’ शी बोलताना व्यक्त केले. ८५% रुग्ण प्राथमिक टप्प्यावरील उपचारांमुळे रेमडेसिविरशिवाय बरे होत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या नातलगांनी भावनातिरेकाने त्याची मागणी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

प्रश्न : रेमडेसिविरच्या सध्याच्या गोंधळाबद्दल तुमचे मत काय?
डॉ. वानखेडकर : रेमडेसिविर अमृत आहे किंवा संजीवनी गुटी आहे असा सध्या पसरलेला समज अत्यंत चुकीचा आहे. रेमडेसिविरचा वापर अत्यंत मर्यादित वेळा, प्रश्न : सध्याच्या गोंधळात सरकारचा हस्तक्षेप काय असावा?

डॉ. वानखेडकर : सरकारने आपली भूमिका निभावली म्हणून हा गोंधळ निर्माण झाला, ज्याला मी “बॅड गव्हर्नन्स’ म्हणतो. याची वाढती मागणी लक्षात घेऊन, संभाव्य मागणी लक्षात घेऊन सरकारने वेळीच त्याची निर्यात रोखणे गरजेचे होते. त्यात विलंब केला. आता माल पडून आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत त्याच्या वितरणासाठीची परवानगी दिली नाही. त्यातून निर्माण झालेल्या टंचाईमुळे जीवघेणा काळाबाजार सुरू झाला आहे. हा काळाबाजार रोखता न येणे हे सरकारी यंत्रणेचे अपयश आहे.

प्रश्न : आणि बॅड पॉलिटिक्स म्हणजे?
डॉ. वानखेडकर : एखादी व्यक्ती कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, त्यांना हे इंजेक्शन मिळते आणि इतरांना नाही हे अत्यंत हिणकस राजकारण आहे. राजकीय नेत्यांनी याचे वाटप करणे हा चुकीचा पायंडा आहे. ८५% रुग्ण प्राथमिक उपचारांनी बरे होत आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता विनाकारण रेमडेसिविरच्या मागे धावू नये, अशी आमची विनंती आहे. निर्यातबंदी आणल्यावर पडून असलेला माल तत्काळ देशांतर्गत बाजारपेठेत वितरित करण्यासाठी सरकारने तत्काळ परवानगी देणे, याची साठेबाजी व काळ्याबाजाराविरोधात कारवाई केली पाहिजे. त्याचे वितरण आपल्या नियंत्रणात घेतले पाहिजे. रेमडेसिविरचा उपयोग योग्य पद्धतीने योग्य वेळी केला तर त्याचा फायदा होऊ शकतो हे खरे; परंतु तसे होईलच असे नाही, याचेही भान सगळ्यांनी बाळगणे गरजेचे आहे.

लाट गृहीत धरून फेब्रुवारीतच नियोजन
फेब्रुवारी महिन्यात औरंगाबादेत रुग्णसंख्या कमी होती. मात्र, शहरात लोक मोठ्या संख्येने विनामास्क फिरत आहेत आणि इतर देशांमध्ये तिसरी लाट उसळली आहे. तशीच औरंगाबादेत परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता आता रेमडेसिविरचा पुरेसा साठा असला पाहिजे, अशी चर्चा फेब्रुवारीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाली. तातडीने हालचाली करून घाटीने मायलाॅन कंपनीकडून फेब्रुवारीमध्ये दोन टप्प्यात पाच हजार तर जिल्हा रुग्णालयाने मार्चमध्ये चार हजार आणि महापालिकेने १० हजार इंजेक्शनची खरेदी केली. त्या वेळी इतर जिल्ह्यांकडून फारशी मागणी नसल्याने पुरवठा करणे कंपनीला सहज शक्य झाले.

नाशकात दुसऱ्या दिवशी वितरणामध्ये गोंधळ
अमरावती जिल्ह्यास दररोज १५०० इंजेक्शनची गरज असताना केवळ ३०० व्हायल उपलब्ध होत असल्याने पीडीएमसी रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाइकांनी रांगा लावल्या होत्या. तर नगरमध्ये रेमडेसिविर शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. नाशकात दुसऱ्या दिवशी वितरणात गाेंधळ झाला. बातमी.

पुण्यात रेमडेसिविरचा काळाबाजार, नातेवाइकांचे आंदोलन; अहमदनगर, अमरावतीमध्ये तुटवडा
पुणे | गुरुवारी पुणे स्टेशन परिसरात सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आणि बंडगार्डन चौकात कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन केले. आपले आप्तस्वकीय कोरोनाशी झुंज देत असताना मेडिकलबाहेर तासन‌्तास रांगेत थांबूनही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध हाेत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक, कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...