आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध कोरोनाविरुद्ध:लसीकरणात महाराष्ट्राचे ‘कोटी उड्डाण; रविवार विक्रमी वार, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर घातली बंदी

देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धच्या युद्धात लसीकरणात आपली आघाडी सातत्याने कायम राखली आहे. रविवार तर या लसीकरणाच्या दृष्टीने विक्रमी वार ठरला असून दुपारपर्यंत सुमारे १ कोटी ३८ हजार ४२१ डोससह महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे या लसीकरणाला राज्यभर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशासह महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास १६ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सहव्याधी व्यक्तींना लसीचा डाेस सुरू करण्यात आला.

यासोबतच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणावर भर देण्यात आला. या प्रत्येक टप्प्यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने आघाडी कायम राखली आहे. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना इतर राज्यांत मात्र प्रशासनात अत्यंत शैथिल्य आल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर ११ ते १४ एप्रिलदरम्याल लसोत्सव आयोजित करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आगामी दोन-तीन आठवडे कोरोनाला रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली होती. त्यानुसार या अावाहनाला महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

दिल्लीत लॉकडाऊनची शक्यता
दिल्लीतही संसर्गामुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे. रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे संकेत दिले आहेत. देशात प्रथमच सक्रिय रुग्ण ११ लाखांवर : देशात प्रथमच कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ११ लाखांच्या वर गेली. सध्या ११,०८,०८७ सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी कोरोनाचे १,६९,९९७ नवे रुग्ण आढळले, तर ७८२ मृत्यू झाले. देशात आतापर्यंत १,३३,५८,८०५ रुग्ण आढळले आहेत, तर १,६९, २७५ मृत्यू झाले आहेत. आयसीएमआरनुसार, शनिवारपर्यंत २५,६६,२६,८५० नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर घातली बंदी
सरकारने रेमडेसिविर इंजेक्शन आणि रेमडेसिविर अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रीडिएंट्स (एपीआय)च्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे या इंजेक्शनची मागणी वाढली असून देशात याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सुधारणा होईपर्यंत ही निर्यातबंदी कायम ठेरली जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना साठा तपासणी करण्याचे आणि काळाबाजार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून काैतुक
रविवारी झालेल्या लसीकरणासंबंधी विक्रमी आकडेवारी जाहीर करताना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सायंकाळनंतरची आकडेवारी यापेक्षा अधिक असेल, असे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात लसीकरणासाठी मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासह या कार्यात झोकून देऊन काम करणारे आरोग्य कर्मचारी तसेच इतरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...