आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना काळात अनेक घाेटाळे झाले, चुकीचे काम गेले, अनेकांचे जीव केले. त्याला जबाबदार असलेल्यांवर कसलीच कारवाई नाही, सुरुवातीला “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि आता मी जबाबदार अशी संकल्पना राबवून सरकार जनतेवर आपली जबाबदारी ढकलून माेकळे हाेत आहे. केवळ फेसबुक लाइव्ह सुरू आहे. तुमचा आवाज जनतेपर्यंत पाेहाेचत आहे. मात्र, जनतेचा आवाज काही पाेहाेचत नाही. त्यामुळे राज्यपालांचे भाषण म्हणजे एक वेदनाच आहे, अपयशाचा लेखाजाेखाच आहे, अशी टीका विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे व सरकारवर केली.
अधिवेशनातील दुसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा हाेता. दुपारी सव्वाबारा वाजता या चर्चेला सुरुवात झाली. राज्यपालांच्या भाषणावर आभाराचा प्रस्ताव मांडणारे आमदार सुनील प्रभू यांनी भाषण केले. त्यानंतर काही सदस्यांची भाषणे झाली. नंतर फडणवीस यांचे भाषण सुरू झाले. जवळपास सव्वा तासाच्या आपल्या भाषणात फडणवीस यांनी सरकारबराेबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विमान नाकारून राज्यपालांचा राेज अपमान करणारे हे सरकार आज राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव मांडत आहे, असे सांगून चाैकात उभे राहून जसे भाषण केले केले जाते तसे भाषण सरकारने लिहून राज्यपालांना दिले, त्यातून वेदनाच दिसत हाेत्या. कोरोनाच्या काळात जंबाे हाॅस्पिटल उभारले, अनेक कामे केली; पण त्यातून लाभार्थी कंत्राटदारच लाभार्थी झाले. कुणाचे घरे भरली गेली, याची माहिती हवी हाेती, असा उपराेधिक टाेला त्यांनी लगावला. केंद्राच्या स्टॅटेस्टिक विभागाने दिलेल्या अहवालातून राज्यात वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ९ लाख ५५ हजार रुग्ण आणि ३० हजार मृत्यू वाचले असते. जे काम राज्य सरकारने केले ते केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच झाले. किती घाेटाळे झाले याची पुस्तिका उद्याच आम्ही प्रकाशित करणार आहाेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्राचा जीडीपी वाढताेच आहे : नाना पटाेले
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून सरकारवर जाेरदार हल्ले झाल्यानंतर तेवढ्याच आक्रमकपणे नाना पटाेले यांनी केंद्रातील माेदी सरकारवर टीका केली. इंधन व गॅस दरवाढीवरून ते म्हणाले की, माेदींनी देशाचा जीडीपी वाढवतो असे सांगितले हाेते, ते खरेही ठरले. कारण त्यांचा जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्राेल आहे, हे आत्ता समजले. देशाच्या सीमा वेळेवर सील केल्या असत्या तर काेराेना आला नसता. केंद्राने ते केले नाही म्हणून काेराेना आला. मध्य प्रदेशचे सरकार पाडल्यानंतर अचानक लाॅकडाऊन केला, अशी टीकाही त्यांनी या वेळी बोलताना केली.
राज्यातील भाजप आयटी सेलची चाैकशी हाेणार : गृहमंत्री अनिल देशमुख
या चर्चेच्या वेळी फडणवीस यांनी सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांची ट्वीटप्रकरणी सरकार चाैकशी करत असल्याचा मुद्दा मांडला, तेव्हा सभागृहात उपस्थित असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्येच हस्तक्षेप करत, या दाेघांची नाही तर भाजप आयटी सेलची ट्वीटप्रकरणी चाैकशी केली जात असल्याची माहिती दिली. त्यावर आम्ही घाबरत नाही, चाैकशा करा, असे फडणवीस म्हणाले.
डाॅक्टरचे काम कंपाउंडरला : कोरोना काळातील माहिती गोळा करण्याचे काम आराेग्य खात्याने करायला हवे हाेते. पण ते काम रस्ते महामंडळाला दिले गेले. हे म्हणजे डाॅक्टरचे काम कंपाउंडरला दिल्यासारखे आहे, असे फडणवीस म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.