आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाविकास आघाडी बैठक:साखर कारखान्यांच्या मदतीवर पवार आग्रही, ठाकरेंचे नंतर बघू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांची उपस्थिती, काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती,लॉकडाऊन, आर्थिक मुद्द्यावरही चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारपासून लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त सूट देऊन पुन्हा लॉकडाऊन वाढवू नये आणि साखर कारखान्यांना त्वरित मदत जाहीर करून साखर कारखाने जगवावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही गोष्टींबाबत आस्ते कदमचे सूतोवाच केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि खासदार संजय राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. काँग्रेसकडून मात्र कोणीही मंत्री अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हते.

...तर जनतेत चुकीचा संदेश जाईल : ठाकरे

साखर कारखान्यांना त्वरित मदत केली नाही तर त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे त्यांना मदत जाहीर करा, अशी मागणी शरद पवार यांनी केली. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगोदरच दोन साखर कारखान्यांना मदत केली आहे. आता आणखी साखर कारखान्यांना मदत जाहीर केली तर त्याचा चुकीचा संदेश जनतेत जाईल. त्यामुळे थोडा वेळ थांबून नंतर याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली. परंतु ती पवार यांना पटली नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

मुंबईत लोकल सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

बैठकीत कोरोना आणि आर्थिक परिस्थितीबाबत चौथ्या टप्प्यात किती आणि कशा प्रकार शिथिलता देता येऊ शकेल यावर सविस्तर चर्चा झाली. मुंबई आणि ठाणे रेड झोन असल्याने या शहरांसाठी काय उपाययोजना कराव्यात, बेड कसे उपलब्ध करावेत, मुंबईत अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी एक लोकल सुरू झाली असून आणखी लोकल सुरू करण्यात याव्यात, श्रमिकांसाठी केंद्र सरकारकडून आणखी गाड्या मागवण्यात याव्यात या बाबींवरही चर्चा झाली. मात्र मुंबईत इतक्यातच लोकल सुरू करण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत. लोकल ट्रेन सुरू झाल्यास कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढेल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

कोविड योद्ध्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे भावनिक पत्र

आपल्याला शस्त्राने नाही तर सेवेने ही मोहीम जिंकायची आहे असे म्हणत कोविड योद्ध्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिश: पत्र लिहून कौतुक केले आहे. ही एक प्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानावेत? ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

यासाठी शरद पवारांचा आग्रह

> मंगळ‌‌‌वारपासूनच लॉकडाऊनमध्ये अधिक सूट द्यावी  > साखर कारखान्यांना त्वरित मदत हवी  > अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त मुंबईत आणखी लोकल सुरू कराव्यात

उद्धव ठाकरेंचे आस्ते कदम

> लॉकडाऊन इतक्यात शिथिल करण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत.  > दोन कारखान्यांना दिली आणखी कारखान्यांना नको  > लोकल सुरू केल्यास कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल > परप्रांतीय मजुरांसाठी केंद्र सरकारकडून आणखी रेल्वे मागवण्याबाबत चर्चा

बातम्या आणखी आहेत...