आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार:भाजप - महाविकास आघाडी थेट भिडणार; पवार - महाडिकांमध्ये लढत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचे शुक्रवारी दुपारी स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपपैकी कोणत्याही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. यात सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात निवडणूक होणार आहे.

आम्हीच जिंकणारः पाटील

राज्यसभा निवडणुकीबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्याच्याकडे प्रथम क्रमांकांची मते कमी असली तरी विजय होतो. यामुळे भाजपचा उमेदवार विजयी होईल. अपक्ष सदस्य आम्हाला मदत करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला आहे.

घोडेबाजार होऊ नये - राऊत

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीने घोडेबाजार होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. आमच्याकडून राज्यसभेचे चित्र स्पष्ट आहे. मात्र, भाजप उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. मविआ 4 उमेदवार निवडूण आणेल. आमचाच विजय होईल. अपक्ष आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. ते मविआ सोबतच राहणार आहेत. आता निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार आहे.

मविआ - भाजपमध्ये चर्चा

राज्यसभा निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अटी आणि शर्थींचा खेळ सुरू झाला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी अन् भाजपने एकमेकांना ऑफर दिली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करावी, भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा, राज्यसभा बिनविरोध केल्यास विधानपरिषदेची पाचवी जागा भाजपला सोडू, असा प्रस्ताव महाविकास आघाडीने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. मात्र, असे असले तरी भाजप निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. महाविकास आघाडीने पाठवलेल्या प्रस्तावावर भाजपची नेमकी काय भूमिका असेल हे आज दुपारी 3 वाजता स्पष्ट होणार आहे. दरम्यान बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अधिकची माहिती दिली.

आम्हाला राज्यसभेची संधी द्या

छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीकडे उर्वरित मतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आम्ही भाजपला सांगितले की तुम्ही आम्हाला राज्यसभेची संधी द्या, आमचा एक उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध जाऊ द्या, आम्ही तुम्हाला विधानपरिषदेची पाचवी जागा सोडण्यास तयार आहेत.

कुणीतरी माघार घ्यावी

भुजबळ पुढे म्हणाले की, फडणवीसांसोबत झालेली चर्चा हसत खेळत झाली. मात्र, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून तीन वाजेपर्यंत माघार घ्यायची आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या नेत्यांना विचारू की, त्यांचा प्रस्ताव काय आहे हे त्यांना सांगू, कुणीतरी एकाने माघार घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे.

भाजपचा 'मविआ'ला प्रस्ताव

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवरून भाजपने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला आहे. त्यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपला राज्यसभेच्या तीन जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव आम्ही महाविकास आघाडीला दिला आहे. आम्हाला 11 ते 12 मतदान कमी पडतायत. आमच्या पक्षाला राज्यसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही राज्यसभेची तिसरी जागा लढवू. या जागेवर आमचाच विजय होईल. मात्र, शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेची पाचवी जागा लढणार नाही.

भाजपला 15 मतांची आवश्यकता

6 जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार असून, दोन अपक्षांसह एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना व भाजप यांच्यापैकी कोण उमेदवारी मागे घेणार यावर एकमत होत नाही. निवडणूक अटळ असल्याचे गुरुवारचे चित्र होते. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी अपक्षांची मनधरणी करावी लागत आहे. शिवसेनेने संभाजी छत्रपती यांना उमेदवारी नाकारली आहे. आता ऐनवेळी संजय पवार यांची उमेदवारी शिवसेनेने मागे घेतल्यास छत्रपतींविषयी दुजाभाव केला म्हणून मराठा समाजाचा रोष ओढवण्याची भीती सेना नेतृत्वाला आहे. भाजपला 3 उमेदवार निवडून आणण्यासाठी 15 मते कमी पडतात. काही अपक्षांना भाजपने आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले असल्याचे समजते. अपक्षांनी मतपत्रिका दाखवल्यास त्यांचे मते बाद होऊ शकते, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे भाजप हा अपक्ष आमदारांची मते बाद होतील, अशी खेळी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फडणवीसांसोबतची बैठक संपली

छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई यांनी आज फडणवीसांची भेट घेतली. भाजपने राज्यसभेसाठीचा तिसरा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी ही भेट घेतली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस देखील आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी एक तर शिवसेनेने दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजपच्या तिसऱ्या उमेदवारामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारासाठी ही धोक्याची घंटा आहे. राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे.

इम्रान प्रतापगढी अडचणीत

1998 मध्ये काँग्रेस आमदारांनी क्राॅस व्होटींग केले होते. त्यामुळे राम प्रधान यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसकडे काठावर बहुमत आहे. काँग्रेसचे काही आमदार क्राॅस व्होटींग करू शकतात. तसे झाल्यास काँग्रेस उमेदवार इमरान प्रतापगढी पहिल्या फेरीत जिंकू शकणार नाहीत. परिणामी भाजपच्या तिसऱ्या उमेदवारास दुसऱ्या क्रमांकाच्या मतांचा लाभ होईल, असे गणित सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...