आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत महाविकास आघाडीची 180 मतांची रणनीती, सरकारची स्थिरता दाखवून देण्याचा प्रयत्न

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या पावसाळी अधिवेशनात (ता. ६ ) होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १७० बहुमतापेक्षा अधिक १० आमदारांचा पाठिंबा मिळवण्याची रणनीती सत्ताधारी महाविकास आघाडीने आखली आहे. सरकार स्थिर असून अपक्ष आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचे दाखवून देण्याचे आघाडीचे नियोजन आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात समन्वय समितीच्या तीन बैठका पार पडल्या आहेत. त्यामध्ये अध्यक्ष निवडणुकीबाबत रणनीती आखण्यात आली आहे. सरकारने नोव्हेंबरमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला तेव्हा १७० आमदारांचे पाठबळ होते. अध्यक्ष निवडणुकीत १० अपक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे सरकारचे नियोजन आहे.

अपक्ष आमदार नेहमी सत्तेचे पाठीराखे असतात. त्यात या आमदारांना निधीचे आश्वासन देण्यात आले आहे. एका भाजप आमदाराने शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आघाडी सरकार अध्यक्षीय निवडणुकीत किमान १८० आमदारांचे पाठबळ मिळवेल, असा आघाडीच्या एका नेत्याने दावा केला.

सरकार पडणार...पडणार अशा वावड्या उठवल्या जातात. त्याला चाप लावण्यासाठी व विरोधी पक्ष भाजपमध्ये वैफल्य आणखी गडद करण्यासाठी समन्वय समितीने अधिकांश आमदारांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मिळवण्याचे नियोजन आखले आहे, असे आघाडीच्या नेत्याने सांगितले. अर्थात हे गणित आरटीपीसीआर चाचणीवर अवलंबून आहे, असे हा नेता म्हणाला. भाजपमध्ये सरकारच्या स्थिरतेमुळे वैफल्य आहे. त्यात सरकारचे पाठबळ १८० पर्यंत जाणार याची कुणकुण लागल्यास ते उमेदवारी दाखल करणार नाहीत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध घडवून आणली जाऊ शकते. तसेच आम्ही परंपरा पाळल्याचा तेसुद्धा दावा करू शकतात, असे आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्याने दिव्य मराठीला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...