आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या सेटवरील कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला आहे. हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. कोल्हापूरमधील रुग्णालयात या कर्मचाऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
नागेश खोबरे असं तटबंदीवरुन कोसळलेल्या तरुणाचे नाव आहे. चित्रीकरणादरम्यान, मोबाईलवर बोलत असतानाच नागेशचा तोल गेला आणि तो तटबंदीवरुन कोसळल्याची माहिती आहे. नागेशवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातील घोड्यांची निगा राखण्याचे काम नागेश करत होता.
अक्षय कुमारचे मराठीत पदार्पण
मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची काही महिन्यांपूर्वीच घोषणा झाली. या चित्रपटातून बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार मराठी पडद्यावर पाऊल टाकतोय. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्याचा लूकदेखील समोर आला होता.
सत्या मांजरेकरांना वगळले?
चित्रपटात हार्दिक जोशी, विशाल निकम, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, प्रवीण तरडे हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकरदेखील चित्रपटातील लूक रिव्हील करण्यात आला होता. पण आता या चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. महेश मांजरेकर यांनी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा रंगली आहे. शिवप्रेमींनी सत्या मांजरेकरच्या निवडीवर आक्षेप नोंदवला होता. त्याच्यावर सडकून टीका झाली होती. सत्या मांजरेकर छत्रपतींचा मावळा म्हणून शोभत नाही त्याला ही भूमिका देऊ नये, अशा शब्दांत अनेकांनी टीका केली होती. या विरोधामुळे महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलाला या भूमिकेतून काढून टाकल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.