आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागणी:आयसीएमआरचेच निकष कोरोना चाचणी करण्यासाठी कायम ठेवा - फडणवीसांची पत्रातून मागणी 

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • फडणवीसांनी संसर्गाचा धोका वाढण्याची भीती केली व्यक्त

कोविड-१९ च्या तपासणीचे निकष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चप्रमाणे (आयसीएमआर) न ठेवता मुंबई महापालिकेने त्यात केलेल्या बदलांमुळे कोरोनाबाधितांची संख्या कृत्रिमरीत्या कमी दिसून प्रत्यक्षात मात्र कोविडचा धोका आणखी वाढू शकतो, अशी भीती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली असून, निकषात बदल न करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्या वतीने कोरोना चाचणीबाबत वेळोवेळी स्पष्ट दिशानिर्देश जारी केले जात आहेत. आतापर्यंत असे एकूण ४ दिशानिर्देश जारी झाले असून, त्यातील ९ एप्रिलच्या आदेशातील मुद्दा क्रमांक ५ स्पष्टपणे सांगतो की, ज्या अतिजोखीम व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणे नाहीत, परंतु तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला आहे, अशांची तो/ती संपर्कात येण्याच्या पाचव्या दिवसापासून ते १४ दिवसांपर्यंत एकदा तपासणी करण्यात यावी. हा स्वयंस्पष्ट आदेश असताना मुंबई महापालिकेने १२ एप्रिल रोजी एक आदेश काढला आणि त्यात अशा अतिजोखमीच्या (हाय रिस्क) संपर्कांची तपासणी करण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. खरे तर आयसीएमआरचेच आदेश राष्ट्रीय पातळीवर सारे पाळत असल्याने त्यात बदल करण्याची काहीच गरज नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेने १२ एप्रिलचा आदेश काढण्याची काहीच गरज नव्हती. तथापि, हा आदेश जारी झाल्यानंतर त्यासंदर्भात विविध माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर पुन्हा एक आदेश १५ एप्रिल रोजी जारी करण्यात आल्याने आणखी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिजोखमीच्या रोगाची लक्षणे नसलेल्या व्यक्तीची तपासणी होण्याची शक्यता दिसत नाही आणि ती केली नाही तर कुणाला जबाबदारसुद्धा धरता येणार नाही. यामुळे आगामी काही दिवसांत मुंबईतील रुग्ण सांख्यिकीदृष्ट्या कमी दिसण्यास यामुळे मदत मिळणार असली तरी त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मात्र कोणतीही मदत होणार नाही. जे व्यक्ती कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले आहेत, त्यांच्या संपर्क आणि संसर्गातून नवीन लोक कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेनेसुद्धा आयसीएमआरच्या धर्तीवर स्वयंस्पष्ट दिशानिर्देश जारी करावेत. कोरोनाग्रस्तांची संख्या कृत्रिमपणे कमी करण्याचा असा प्रयत्न लाखो लोकांच्या जीवनासाठी घातक ठरू शकतो. मुंबई महापालिकेला आपली ही रणनीती बदलण्यासाठी आपण निर्देश द्याल, अशी आशाही फडणवीसांनी पत्रात व्यक्त केली.

यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी वेगवेगळ्या माध्यमांतून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सतत बैठकांमध्ये व्यग्र असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आदेशातील एका मुद्द्यामुळे गोंधळ

१५ एप्रिलच्या मुंबई महापालिकेच्या आदेशातील मुद्दा क्र. डी-१ व मुद्दा क्र. डी-४ मुळे संभ्रम निर्माण झाला आहे. एकात चाचणीची गरज नाही, असे म्हटले आहे, तर मुद्दा डी-४ चा अर्थ अतिजोखमीच्या व्यक्तीची पाचव्या दिवशी निरीक्षण करून लक्षणे दिसली तरच चाचणी करता येईल, असा होतो. येथे सांगावेसे वाटते की, चीनमध्ये कोरोनाच्या ४४ टक्के केसेसमध्ये लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडूनच दुसऱ्यांना संसर्ग झालेला आहे. केवळ भाषा बदलली असली तरी यातून मुंबई महापालिकेच्या १२ एप्रिलच्याच आदेशाचा अर्थ कायम ठेवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...